वाहतूक कोंडीवर बायपासचा पर्याय

वाहतूक कोंडीवर बायपासचा पर्याय

पाली, ता. ९ (वार्ताहर)ः अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात वाहतूक कोंडीमुळे स्‍थानिक नागरिकांसह भाविक त्रस्‍त आहेत. येथील बाह्यवळण मार्गाला मान्यता मिळून १३ वर्षे होत आली, तरी अद्याप कामाला मुहूर्त न मिळाल्‍याने पालीवासी कोंडीच्या विळख्यात सापडले आहेत.
पालीत वर्षभर भाविकांची गर्दी असते, त्यात उन्हाळी सुट्यांमध्ये रोज हजारोच्या संख्येने भाविक व त्यांची वाहने पालीमध्ये दाखल होतात. सरकारी कार्यालये याठिकाणी असल्‍याने कामानिमित्त व दाखल्‍यांसाठी सुधागड तालुक्‍यातील नागरिक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने वर्दळ असते.
पालीतील अरुंद रस्ते असल्‍याने अवजड वाहने, अवैधरीत्या पार्क केलेली वाहने व अनधिकृत बांधकामांमुळे शहरात दररोजच वाहतूक कोंडी होते. वाहनचालक, भाविक, पादचारी व विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागत असल्‍याने नाहक मनस्‍ताप सहन करावा लागतो.
बल्लाळेश्वर मंदिर, ग.बा. वडेर विद्यालय, जुने एसटी.स्टँड, गांधी चौक, मारुती मंदिर, बाजारपेठ, हाटाळेश्वर चौक, मारुती मंदिर या भागात वाहतूक कोंडीचे ग्रहणच लागले आहे. वाहतूक पोलिस तैनात असले तरी त्‍यांचीही कोंडीवर नियंत्रण मिळवताना दमछाक होते. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात देवस्थानचे सुरक्षारक्षकही कोंडी सोडविण्यासाठी तैनात असतात. अनेक वेळा वाहतूक कोंडीमुळे रुग्णांना तसेच रुग्णवाहिकेस रुग्णालयात पोहोचण्यास उशीर होतो. शहरात नियमित होणारी वाहतूक कोंडीवर उपाय म्‍हणून बाह्यवळण (बायपास) मार्गाचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी पालीवासीयांकडून करण्यात येत आहे.

पालीतील रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. काही ठिकाणी केलेले अनधिकृत बांधकामही हटवले आहे. बाह्यवळण मार्ग झाल्यास पाली शहरातील वाहतूक सुरळीत होईल. शिवाय भाविकांची वाहने व अवजड वाहनांची वाहतूक शहराबाहेरून होईल. रस्‍त्‍याच्या कामात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांना योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. चालकांनीही वाहतुकीचे नियम पाळावेत.
- प्रणाली सूरज शेळके, नगराध्यक्षा, नगरपंचायत, पाली

पालीतील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस उग्ररूप धारण करत आहे. शिवाय व्यापारी अतिक्रमण, अपर्यायी आणि अवैध पार्किंग, अवजड व डंपर वाहतुकीमुळे ती अधिक जटिल झाली आहे. बाह्यवळण मार्ग लवकर होणे आवश्‍यक आहे.
- कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पाली

भूसंपादनासाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हा प्रस्ताव भूसंपादन अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जमिनीच्या किमती निर्धारित केल्या जातील आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांना ठरलेली रक्कम देण्यात येईल. व मार्गाच्या कामाला सुरुवात होईल.
- दिलीप मदने, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाली-सुधागड

नऊ हेक्‍ट जागा संपादित!
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हा मार्ग होणार आहे. राज्य सरकारने २०१० या वर्षी या रस्त्याला मान्यता दिली आहे. तसेच रस्त्याच्या कामासाठी १८ कोटी तर भूसंपादनासाठी १० कोटींची मंजुरी मिळाली होती. हा मार्ग वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग ५४८(ए) व पाली-पाटणूस राज्यमार्ग ९४ ला जोडण्यात येणार आहे. यासाठी बलाप, पाली, बुरुमाळी व झाप या गावातील एकूण ९ हेक्टर जागा संपादित करण्यात येणार आहे.

रस्‍ते रुंदीकरणात अडथळा
पाली गावातील रस्ते रुंदीकरण होणे अवघड आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बाह्यवळण हा एकमेव पर्याय आहे. बाह्यवळण मार्ग लवकर सुरू व्हावा यासाठी फारसे कोणी लोकप्रतिनिधी पाठपुरावा करताना दिसत नाही. बाह्यवळण मार्ग झाल्यास मोठ्या गाड्या पाली शहरात दाखल होणार नाहीत. त्यामुळे बरीचशी वाहतूक कोंडी कमी होईल.

वाहनांची रेलचेल

मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. तेथे वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मुंबईवरून कोकणाकडे जाणारे प्रवासी पालीतून विळेमार्गे माणगाव किंवा वाकणवरूण पुढे जातात. तर कोकणातून येणारी वाहने माणगावहून विळेमार्गे पालीतून खोपोलीमार्गे पुणे-मुंबईकडे जातात. परिणामी पालीत वाहनांची रेलचेल वाढल्‍याने कोंडीत भर पडली आहे. बाह्यवळण मार्गाचे काम झाल्‍यास, बहुतांश वाहने शहराबाहेरूनच निघून जातील, आणि वाहतूक सुरळीत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com