जलवाहिनी गळतीमुळे पालीवासी त्रस्‍त

जलवाहिनी गळतीमुळे पालीवासी त्रस्‍त

पाली, ता. १५ (वार्ताहर)ः वारंवार फुटणाऱ्या जलवाहिन्यांमुळे अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्‍या पाली शहरात वारंवार पाणीटंचाईचे सावट निर्माण होत आहे. शनिवार, रविवारी पुन्हा एकदा अंबा नदीच्या जॅकवेलजवळ मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरातील अनेक ठिकाणी पाणी पुरवठा बंद होता. याआधीही जलवाहिन्या फुटल्यामुळे पालीतील पाणी पुरवठा खंडित झाल्‍याचे प्रकार घडले आहेत.
पाली शहरात अंबा नदीतून पाणी पुरवठा करण्यात येतो. उन्हाळ्यातही नदीला मुबलक पाणी आहे. मात्र नियोजनाअभावी नागरिकांना नाहक पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. अंबा नदीजवळील जॅकवेलमधून पंपाद्वारे पाणी सरसगडाच्या पायथ्याशी असलेल्या चार साठवण टाक्यांमध्ये सोडले जाते. तेथून पाली नगरपंचायत क्षेत्रात पाणीपुरवठा केला जातो. काही ठिकाणी नदीतील पाणी थेट मोटारीने सोडले जाते, मात्र सध्या पुलाचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने एचसीबी वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. पाण्याच्या प्रचंड दबावामुळे व कमकुवत जलवाहिन्यांमुळे त्‍या वारंवार फुटतात. परिणामी पाण्याचा अपव्यय होतो शिवाय दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा खंडित केला जातो.
शिवाय जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती लागल्याने शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. सतत तक्रारी करूनही उपाययोजना होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अंबा नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. हे काम अपूर्ण असल्याने जलवाहिनीच्या कामातही अडथळा येत असल्‍याची माहिती नगरपंचायतमार्फत दिले जात आहे.
ज्यांच्याकडे किंवा जवळपास बोअरवेल किंवा विहीर आहे त्यांना किमान पाणी उपलब्‍ध तरी होते, मात्र ज्‍या ठिकाणी दोन्हींची सोय नाही, तेथील नागरिकांना मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागते अथवा विकतचे पाणी आणावे लागते. खडकआळी येथे नगरसेवक विनायक जाधव यांनी टंचाईग्रस्‍त नागरिकांसाठी टँकर उपलब्‍ध करून दिला आहे.

पाणी टंचाईचे सावट
अंबा नदीवरील जॅकवेलमध्ये असलेल्या पंपांद्वारे पाणी सरगडाच्या पायथ्याशी असलेल्या चार साठवण टाक्यांमध्ये सोडले जाते. तेथून पाली शहरात पाणीपुरवठा होतो. जॅकवेल ते साठवण टाक्यादरम्‍यान अंतर मोठे असून वाहिन्या जीर्ण झाल्‍या आहेत. त्‍यामुळे दाब वाढताच त्‍या फुटतात. याशिवाय साठवण टाक्यांची दुरवस्था, सतत बिघडणारे व अपुऱ्या क्षमतेचे पंप, नवीन पुलाचे सुरू असलेले काम, जॅकवेलमध्ये गाळ साठणे, जुने व्हॉल फुटणे, खंडित वीजपुरवठा आदी कारणांमुळे पालीत नेहमी पाणीटंचाई भेडसावते. याठिकाणी नळपाणी योजना राबवल्‍यास पाणीटंचाईचे सावट दूर होण्याची शक्‍यता असल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे.

शुद्ध पाणी योजनेची प्रतीक्षा
२००८-०९ च्या सर्व्हेनुसार, पालीची लोकसंख्या व दररोज येणारे भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार, शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण सात कोटी ७९ लाखांचा निधी व १० टक्के लोकवर्गणीद्वारा नळयोजना राबवली जाणार होती, परंतु राजकीय श्रेयवादामुळे योजना रखडली. पालीला ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. तसेच शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेसाठी २७ कोटींहून निधी मंजूर झाला आहे. लोकवर्गणीची अटही शिथिल करण्यात आली आहे. पण अजूनही योजना कार्यान्वित होऊ शकलेली नाही.

फुटलेली जलवाहिन्यांची ताबडतोब दुरुस्ती करून त्या पूर्ववत केल्या जातात. लवकरच नवीन जलवाहिनीचे काम हाती घेण्यात येणार आहे. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत.
- सुधीर भालेराव, पाणी पुरवठा सभापती, पाली नगरपंचायत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com