
पाली, ता. ८ (वार्ताहर) ः पालीतील नागरिकांना अंबा नदीतून पाणीपुरवठा होतो, मात्र सध्या नदीची पाणीपातळी खालावली आहे. तसेच गाळ व शेवाळ्यामुळे पाणी दूषितही झाले आहे, मात्र नगर पंचायतने पुढाकार घेऊन पाटबंधारे विभागाच्या साहाय्याने अंबा नदीत उन्हेरे धरणातील पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पालीकरांवरील पाणीसंकट टळले असून, पुढील काही महिने मुबलक व स्वच्छ पाणी मिळण्याची शक्यता आहे.
दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्यामुळे पालीतील नागरिक काही दिवसांपासून त्रस्त होते. दूषित पाणी प्यावे लागल्याने रोगराई पसरण्याचीही शक्यता असल्याने अनेक ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी विकत घ्यावे लागत होते. तसेच नदीची पाणी पातळी खाली गेल्यामुळे पाणीटंचाईची समस्याही भेडसावत होती. परिणामी पाली नगरपंचायतीने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देत, पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून उन्हेरे धरणातून अंबा नदीत पाणी सोडण्याची व्यवस्था केली. धरणाचे पाणी अंबा नदीत आल्यामुळे दूषित पाणी आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याची समस्या काही प्रमाणात सुटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पाणीपुरवठ्याच्या समस्येची तातडीने दखल घेतली आहे. पाटबंधारे विभागाच्या सहकार्याने उन्हेरे धरणातून अंबा नदीत पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. आमचे प्राथमिक उद्दिष्ट नागरिकांना शुद्ध व दुर्गंधीमुक्त पाणी उपलब्ध करून देणे आहे आणि त्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.
- विद्या येरूणकर, मुख्याधिकारी, पाली नगर पंचायत
दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना केली आहे. भविष्यात अशा समस्या पुन्हा उद्भवू नये म्हणून दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत नियोजन सुरू आहे.
- प्रतीक्षा सुबोध पालांडे, पाणीपुरवठा व आरोग्य सभापती, पाली
शुद्ध पाणी योजना प्रलंबित
पाली शहरासाठी शुद्ध पाणी योजना १९७४ मध्ये मंजूर झाली असून, ती आजतागायत प्रलंबित आहे. सद्यःस्थितीत तिचा एकूण खर्च २७ कोटींवर गेला आहे, मात्र ही २७ कोटींची शुद्ध पाणीपुरवठा योजना लालफितीत अडकली आहे. राजकीय हेवेदावे आणि प्रशासकीय बाबींमध्ये योजना अडकल्यामुळे पालीतील नागरिक अजूनही शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. निवडणूक काळात सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व तत्कालीन मंत्री हे शुद्ध पाणी योजना कार्यान्वित करू, असे आश्वासन देतात, मात्र त्याची आजतागायत अंमलबजावणी झालेली नाही.
पाली ः उन्हेरे धरणातून अंबा नदीत पाणी सोडण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.