रायगड जिल्हा परिषदेत २,६०९ पदे रिक्त
रायगड जिल्हा परिषदेत २,६०९ पदे रिक्त
प्रशासनावर कामाचा वाढता ताण; रिक्त पदे भरण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १ : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी असलेल्या रायगड जिल्हा परिषदेत विविध विभागांतील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांमुळे प्रशासनावर कामाचा अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेत मंजूर असलेल्या ११ हजार ५५५ पदांपैकी तब्बल दोन हजार ६०९ पदे सध्या रिक्त असून, ही पदे तातडीने भरण्याची मागणी जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
रायगड जिल्हा परिषदेचा कारभार गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकांच्या माध्यमातून सुरू आहे. जोपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या दैनंदिन कामकाजाची संपूर्ण जबाबदारी प्रशासकांवरच आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने सध्या कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. जिल्हा परिषदेत गट ‘ब’, ‘क’ व ‘ड’ संवर्गातील पदे रिक्त आहेत. सध्या रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे जिल्हा परिषदेचा कारभार सांभाळत आहेत. जिल्हा परिषदेत विविध विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू असून, ही प्रक्रिया लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रिक्त पदे भरल्यास प्रशासन अधिक सक्षम होऊन ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
शिक्षण विभागात सर्वाधिक रिक्त पदे
गट ‘ब’ संवर्गात सामान्य प्रशासन विभागातील सामान्य लघुलेखक तीन, वित्त विभागातील सहाय्यक लेखाधिकारी सात, बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता ३४, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता ५४, शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी ४६, केंद्रप्रमुख १३२ तसेच प्राथमिक मुख्याध्यापकांची ९५ पदे रिक्त असून, एकूण ३७१ पदांचा यात समावेश आहे.
‘क’ संवर्गात २,०५० रिक्त पदे
गट ‘क’ संवर्गात सर्वाधिक रिक्त पदे असून, एकूण २,०५० पदे रिक्त आहेत. यामध्ये सामान्य प्रशासन विभाग १६४, वित्त विभाग १९, ग्रामपंचायत विभाग ८६, आरोग्य विभाग ६४०, बांधकाम विभाग ८७, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग एक, पशुसंवर्धन विभाग २५, प्राथमिक शिक्षण विभाग ९८१ तसेच महिला व बालकल्याण विभागातील ३६ पदांचा समावेश आहे.
‘ड’ संवर्गात १९२ रिक्त जागा
त्याचप्रमाणे गट ‘ड’ संवर्गातही १९२ पदे रिक्त असून, त्यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील १३८, पशुसंवर्धन विभागातील चार, आरोग्य विभागातील २० व बांधकाम विभागातील ३० पदांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

