

युद्धाचे पडसाद सोशल मीडियावर
मिम्समधून व्यक्त होतेय महागाईची झळ, गॅस टंचाईवर विनोदी पोस्ट व्हायरल
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. ३० (वार्ताहर) : इराण आणि इस्राईल यांच्यात सुरू असलेल्या लष्करी संघर्षामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले असले, तरी सोशल मीडियावर या घडामोडींना वेगळ्याच पद्धतीने प्रतिसाद मिळताना दिसत आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर युद्धाशी संबंधित मिम्स, जोक्स आणि रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी उपरोधिक शैलीत परिस्थिती मांडली आहे.
युद्धामुळे इंधन दरवाढ आणि गॅस टंचाईची भीती व्यक्त होत असताना, त्यावर आधारित अनेक मार्मिक पोस्ट समोर येत आहेत. चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा फोटो, चूल पेटवा, देश वाचवा असा संदेश, तसेच सिलिंडर घेऊन येणाऱ्या व्यक्तीचे औक्षण करणारे रील्स मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. हॉटेलमध्ये चुलीवर स्वयंपाकाचे फोटोही चर्चेत आहेत.
याशिवाय, ‘इराणशी वाकडं, तर चुलीत लाकडं’ अशा नव्या म्हणी तयार करत नेटकऱ्यांनी महागाईचा मुद्दा हलक्याफुलक्या शैलीत मांडला आहे. काही व्हॉट्सॲप चॅट्समध्ये ‘सिलिंडर एक्स्ट्रा आहे का?’ अशा विनोदी संवादांनीही लक्ष वेधले आहे.
चौकट :
जनहितार्थ इशारा
युद्धाचे परिणाम गंभीर असले तरी सोशल मीडियावर त्याचे हलके-फुलके चित्र रंगवले जात आहे. मात्र या विनोदांमागे वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि गॅस टंचाईची खरी चिंता दडलेली असल्याचे स्पष्ट दिसून येते.