लांबपल्‍ल्‍याच्या प्रवाशांची महाडमध्ये गैरसोय

लांबपल्‍ल्‍याच्या प्रवाशांची महाडमध्ये गैरसोय

(वार्तापत्र)

सुनील पाटकर, महाड
ऐतिहासिक, व्यापार, पर्यटन व औद्योगिक दृष्ट्या रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचा म्हणून महाड तालुका ओळखला जातो. कोकण रेल्वे मार्गावर महाड तालुक्यातील चार रेल्वे स्थानके आहेत, तरीही येथील प्रवासी लांबपल्ल्याच्या गाड्यांपासून दूरच आहेत. येथील प्रवाशांना कोकण रेल्वेच्या प्रवासाचा केवळ स्थानिक पातळीवरच उपयोग होत आहे.
तालुक्यामध्ये वीर, करंजाडी, सापेवामने व विन्हेरे अशी कोकण रेल्वेची चार स्थानके आहेत. यापैकी वीर स्थानक मुंबई-गोवा महामार्गावर असल्याने महाडमधील बहुतांशी प्रवाशांची ये-जा वीर स्थानकातून होत असते. स्थानक महाडपासून १३ किमी दूर आहे.
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे दिल्ली, गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ, गुजरात, राजस्थान आदी ठिकाणीही कोकण रेल्वेच्या गाड्यांची वाहतूक सुरू असते. परंतु महाडमधून या गाड्या दुरूनच निघून जातात. तालुक्याचा विचार करता किल्‍ले रायगड, चवदार तळे, शिवथळघळ व इतर पर्यटन स्थळे तसेच महाबळेश्वर सारखे थंड हवेचे ठिकाण महाडजवळ आहेत. महाड येथे मोठे औद्योगिक क्षेत्रही विकसित झाले असल्याने उद्योगाला चालना मिळत आहे. तर वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या कामगारांची संख्याही मोठी आहे.
पर्यटन व अन्य माहिती तसेच संकेतस्थळावर रायगड, महाबळेश्‍वर, चवदार तळे या ठिकाणांसाठी जवळचे स्थानक माणगाव दाखवले जाते. महाड तालुक्यातील ४ स्थानकांचा विचार करता वीर स्थानकावर दोन पॅसेंजर व दोन एक्स्प्रेस गाड्या थांबतात. म्हणजेच वीर स्थानकावर केवळ आठ गाड्या थांबतात. मुंबईकडे जाण्यासाठी एकही एक्स्प्रेस उपलब्ध नाही. यापैकी तुतारी एक्स्प्रेसची वेळ महाडकरांना कोणत्याही परिस्थितीत जुळत नाही. तसेच अन्य लांब पल्ल्यांच्या गाड्या थांबत नसल्याने महाडकर लांब पल्ल्यांच्या गाड्यांपासून दूर आहेत.
महाडमधील अनेक प्रवासी संघटनांनी यापूर्वी आंदोलने केली आहेत. मोर्चे काढले आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले आहे. परंतु राजकीय इच्छाशक्तीअभावी तसेच प्रवाशाच्या रेट्याअभावी याठिकाणी रेल्वेला थांबा अजूनही मिळालेला नाही. आता कोकण रेल्वेचे दुपदरीकरणही झाले आहे. अनेक स्थानकांना क्रॉसिंग स्थानकांचा दर्जाही मिळत आहे. अशावेळी महाड जवळ असणाऱ्या वीर स्थानकाचा लांब पल्ल्यांच्या गाड्या थांबण्यासाठी उपयोग करून घ्यावा लागणार आहे. हे स्थानक महामार्गावर असल्याने महामार्ग चौपदरीकरणानंतर येथे स्थानकापर्यंत पोचणे प्रवासांना सहज शक्य होईल. याकरता वीर स्थानकावर लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा गरजेचा आहे. अन्यथा चार स्थानके असूनही व्यापार, पर्यटन, रोजगार अशा विविध क्षेत्रातील प्रगतीपासून महाड तालुका दूर राहील.

वीर स्‍थानक दुर्लक्षित
महाड ही जुनी बाजारपेठ असल्याने व्यापारी दृष्ट्याही तालुका महत्त्‍वाचा आहे. रेल्वे स्थानकाला नाव देते वेळी वीर स्थानकाचा उल्लेख महाड रोड असा करण्यात आला नाही किंवा तशी मागणीही त्या वेळी झाली नाही. त्यामुळे या स्थानकाला शहर व तालुक्याची ओळख मिळालेली नाही. त्यामुळे वीर वा अन्य स्थानके ही छोटी स्थानके म्हणून कोकण रेल्वे दरबारी गणली जातात. त्यामुळे वीर स्थानकावर लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वानवा आहे.

माणगाव, चिपळूणचा आधार
महाडमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त आलेले वेगवेगळ्या राज्यातील अनेक नागरिक वास्तव्यास आहेत. यांनाही या रेल्वे प्रवासाचा लाभ घेता येत नाही. उलटपक्षी महाडपासून ३० अंतरावर असलेल्या माणगाव व पुढे रोहा या दोन रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात रेल्वेची वर्दळ असते. माणगाव येथे २२ गाड्या तर रोहा येथे १८ गाड्या थांबतात. याव्यतिरिक्त सर्व हंगामी गाड्या या ठिकाणी थांबतात. परंतु महाड तालुक्यातील स्थानकांचा चाकरमान्यांना व्यतिरिक्त अन्य प्रवाशांना लाभ मिळत नाही. लांबच्या प्रवासासाठी महाड व परिसरातील प्रवाशांना माणगाव, चिपळूण अथवा पनवेल गाठावे लागते.

महाड - विन्हेरे स्थानक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com