महाडमध्ये रंगले चक्क देव दानवांचे युद्ध

महाडमध्ये रंगले चक्क देव दानवांचे युद्ध

महाड, ता. ७ (बातमीदार) : देव आणि दानवांच्या युद्धाच्या कथा पुराणांमध्ये नेहमीच वाचनात येतात. परंतु देव-दानवांच्या या युद्धाला होळीच्या सणांमध्येही स्थान असल्याचे महाडमध्ये दिसून येते. महाडमधील गवळआळीत साजऱ्या होणाऱ्या होळीमध्ये होळीतील जळती लाकडी एकमेकांवर फेकून देव-दानवांच्या युद्धाचा हा अनोखा खेळ खेळला जातो. ही आगळीवेगळी होळी पाहण्यासाठी महाड शहरातील नागरिकही मोठी गर्दी करतात.
कोकणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते. होळीभोवती लोकगीते म्हणून, पूजाअर्चा व होळीला नारळ अर्पण करून होळी पेटवली जाते. होळीतील गाऱ्हाणे, बोंबा, फाग यांनी होळीला जल्लोष येत असतो. महाड शहरातील गवळ आळीमध्येही सगळ्या वेगळ्या पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते. होळी पेटवल्यानंतर होळीमधली जळकी लाकडे हातात घेऊन ती चक्क एकमेकांवर फेकली जातात. होळीच्या एका बाजूला एक गट दुसऱ्या बाजूला दुसरा गट उभा असतो. यातील एक गट देवांचा तर अन्य गट दानवांचा मानला जातो. दानवांचा गट प्रसाद घेऊन प्रभूराम मंदिराच्या शेजारील गल्लीने नदीच्या नदीच्या पायऱ्यांकडे पळून जातात. नदीवरही काही जळकी लाकडे तयार असतात. काही सेकंदात ती जळकी लाकडे घेऊन गवळ आळीच्या त्या होळीच्या दिशेने फेकली जातात. अशा प्रकारे हा खेळ सुरू असतो. सुमारे चार-पाच मिनिटे हे युद्ध चालते. दोन्ही गटातील माणसे एकमेकांसमोर येत काठीला काठी लावतात आणि त्यानंतर खेळाची सांगता होते. विशेष म्हणजे ही जळती लाकडे एकमेकांवर फेकण्याच्या या युद्धात कोणीही जखमी झाल्याचे अथवा कोणाला लागल्याचे उदाहरण अद्यापही नसल्याचे येथील ज्येष्ठ व्यक्ती आवर्जून सांगतात.
..........

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com