दक्षिण रायगडमध्ये रंगांची उधळण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दक्षिण रायगडमध्ये रंगांची उधळण
दक्षिण रायगडमध्ये रंगांची उधळण

दक्षिण रायगडमध्ये रंगांची उधळण

sakal_logo
By

महाड, ता. १२ (बातमीदार) : रंगीबेरंगी झालेले चेहरे, रंगाने भरलेल्या पाण्याच्या पिचकाऱ्या, एकमेकांवर फोडले जाणारे रंगांचे फुगे आणि विविध रंगांची एकमेकांवर उधळण करत महाडसह दक्षिण रायगडमध्ये रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी धुळवडीच्या दिवशीच रंगांची उधळण करण्याची परंपरा असली तरीही रायगड जिल्ह्यातील दक्षिण भागांमध्ये पंचमीच्या दिवशीच रंगपंचमी साजरी केली जाते.
महाड व परिसरात दुपारी बारानंतर रंगपंचमी खेळली जात असल्याने सकाळी सुरू असलेले व्यवहार दुपारनंतर ठप्प झाले. आज रविवार असल्याने बच्चेकंपनीला सुट्टी होती. त्यामुळे सकाळपासूनच सर्वजण रंगात हरवून गेले होते. शहरातील सर्व दुकाने दुपारी काहीकाळ रंगपंचमीमुळे बंद होती. रंग खेळणाऱ्यांशिवाय अन्य कोणी रस्त्यावर फिरत नव्हते. शहरातील रस्त्यांवर, चौकाचौकांत तर इमारतीखाली अनेक जण एकमेकांवर रंगांची उधळण करत होते. अनेक ठिकाणी चौकाचौकांत तरुणांनी वाहनचालकांना अडवत ‘बुरा ना मानो, होली है’, असे म्हणत रंगांची उधळण केली; तर लहान मुलांनी रस्त्यावर गाड्या अडवून पोस्त वसूल केले. महाड, बिरवाडी, पोलादपूर, गोरेगाव, माणगाव, म्हसळा, तळा तालुक्यात ग्रामीण भागातही रंगपंचमीचा उत्साह सायंकाळपर्यंत कायम होता.
-----------------------------------------
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट
काहींनी रंगपंचमी असल्याने बाहेर जाण्याचे टाळले होते. बाजारपेठेतही आज सर्वच ठिकाणी रंगपंचमीचा जल्लोष सुरू होता. व्यापाऱ्यांनी दुपारी आपली दुकाने बंद ठेवून सणाचा आनंद लुटला. दुपारनंतर उत्साहाला उधाण आले आणि बघताबघता सर्वच ठिकाणी रंगीबेरंगी चित्र दिसू लागले. आपल्याला रंगवू नये म्हणून काहीजण बचावात्मक पवित्रा घेऊन मार्ग काढत घर गाठत होते.