शिरवलीत शिक्षकांसाठी ग्रामस्‍थ एकवटले

शिरवलीत शिक्षकांसाठी ग्रामस्‍थ एकवटले

महाड, ता. २७ (बातमीदार) : अनेक गावांमध्ये शिक्षक काम करत नाहीत म्हणून त्यांची बदली करा, अशा तक्रारी पालक-विद्यार्थ्यांकडून करण्यात येतात. मात्र शिक्षक दाम्‍पत्याची बदली रद्द करावी, हेच शिक्षक आम्हाला पाहिजे, असा आग्रह महाड तालुक्यातील शिरवली येथील ग्रामस्थांनी धरला आहे. शाळेतील मुलांची प्रगती आणि शिक्षकांची अध्यापनाची पद्धतीमुळे मुलांचा सर्वांगिण विकास होत असल्‍याने आमच्या मुलांकरिता हेच शिक्षक योग्य असल्याची ग्रामस्थांची मागणी आहे
शिरवली गावात जिल्हा परिषदेची उर्दू शाळा आहे. उर्दूप्रमाणे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी माध्यमातूनही शिकवले जाते. मराठी माध्यमाप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमांची स्थितीही चिंताजनक आहे. कमी होणारी विद्यार्थ्यांची पटसंख्या, शिक्षकांची अपुरी संख्या अशा समस्या असतानाही शिरवली मोहल्‍ल्‍यातील उर्दू शाळा मात्र शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनाही आवडीची बनली आहे.
अहमद बागवान आणि त्यांची पत्‍नी शिरीन हे दाम्‍पत्य दहा वर्षे उर्दू शाळेत अध्यापनाचे काम करत आहेत. विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी मिळून मिसळून वागत त्यांच्या समस्या जाणून घेत, गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न केला जात आहे. यामुळे मुलांनाही हेच शिक्षक हवेहवेसे वाटू लागले. विविध शैक्षणिक उपक्रम राबवत असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भर पडत आहे. नुकतीच त्यांची बदली झाल्याचे ग्रामस्थांना कळतात, शिक्षकांची बदली न करता या ठिकाणी आणखी दोन शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शिरवली उर्दू शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून या ठिकाणी दोन शिक्षक आणि एक तात्पुरत्या स्वरूपात असे तीन शिक्षक कार्यरत आहेत. शाळेची पटसंख्या ३६ असून फक्त तीन शिक्षक कार्यरत आहेत. ज्या शिक्षकांच्या बळावर विद्यार्थ्यांची प्रगती साधली जात आहे, त्याचीच बदली झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, अशी भीती पालकांना आहे.

दहा वर्षे या शिक्षक उभयतांनी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवत यांची प्रगती साधली आहे. उर्दू शाळांत शिक्षकांची कमतरता असताना अशा शिक्षकांची बदली केली जाऊ नये आणि मुलांचा शैक्षणिक विचार करून यांना पुन्हा या ठिकाणी कायम करावे.
- युसूफ पोशिलकर, सामाजिक कार्यकर्ते, शिरवली मोहल्ला

महाड ः

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com