मुंबईत ३० जानेवारी रोजी होमी भाभा समूह विद्यापीठात होमी भाभा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

मुंबईत ३० जानेवारी रोजी होमी भाभा समूह विद्यापीठात होमी भाभा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

मुंबई, ता. २२ : भारताच्या अणुकार्यक्रमाचे मुख्य शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांना खरी श्रद्धांजली म्हणून मुंबईत त्यांच्या नावे सुरू असलेल्या पहिल्या क्लस्टर विद्यापीठात आणि त्यांनी शिक्षण घेतलेल्या ठिकाणी त्यांच्या अर्धपुतळा रूपात डॉ. होमी भाभा यांचे स्मारक साकारण्यात आले आहे. या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण ३० जानेवारीला कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी आणि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजनीश कामत, प्रा. युवराज मलघे, कुलसचिव यांची उपस्थिती असेल.
महाराष्ट्र सरकारने २०१९मध्ये बहुविद्याशाखीय फोकस असलेले राज्यातील पहिल्‍या क्लस्टर विद्यापीठाला डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी असे नाव देण्यात आले आहे. त्या विद्यापीठात हा पुतळा उभा राहत आहे. भारताच्या अणुकार्यक्रमाचे जनक होमी जे भाभा यांच्या फ्रान्समध्ये विमान अपघातात निधन झाल्याच्या ५३ वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये फ्रान्समध्ये पहिल्या स्मारकाचे उद्घाटन केले. भाभांचा अर्धपुतळा हा बिर्ला इंडस्ट्रियल टेकनॉलॉजिकल मुझियम कोलकाता येथेदेखील सुस्थापित केला आहे. त्यानंतर मुंबईत हा पुतळा उभा राहिला आहे. एल्फिन्स्टन कॉलेज आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (ज्याला स्वातंत्र्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स असे संबोधले जाते) जिथे होमी भाभानी आपले शिक्षण घेतले ते या विद्यापीठाचा भाग आहे. त्या विद्यापीठात त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे कुलगुरू कामत यांनी सांगितले.


यांनी साकारला पुतळा
पुतळ्याचे काम शिशिर शिंदे तसेच परिसर जडणघडणीचे काम जय केदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती कुलगुरू प्रा. राजनीश कामत यांनी दिली.

कोण आहेत होमी भाभा...
होमी जहांगीर भाभा भारताच्या अणु-विज्ञान कार्यक्रमाच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक, भारताला आण्विक युगात आणणाऱ्या दोन संस्थांची स्थापना आणि दिग्दर्शन केले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि अणुऊर्जा आस्थापना, ट्रॉम्बेने नंतर त्यांच्या सन्मानार्थ भाभा अणू संशोधन केंद्र असे नामकरण केले. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म मुंबई येथे ३० ऑक्टोबर १९०९ मध्‍ये जहांगीर आणि मेहेरबाई भाभा यांच्या पोटी झाला. जहांगीर भाभा बंगळूरुमध्ये वाढले होते आणि त्यांचे शिक्षण ऑक्सफर्डमध्ये झाले होते. इंग्लंडमध्ये वकिलीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर जहांगीरने म्हैसूर येथे काम सुरू केले आणि ते राज्याच्या न्यायिक सेवेत रुजू झाले. भिकाजी फ्रामजी पांडे यांची कन्या आणि बॉम्बेचे प्रसिद्ध समाजसेवी दिनशॉ पेटिट यांची नात मेहेरबाई यांच्याशी त्यांनी विवाह केला. लग्नानंतर, हे जोडपे ब्रिटिश भारतातील पहिले व्यावसायिक शहर बॉम्बे येथे गेले जेथे तरुण भाभा यांचे बालपण गेले. होमी यांचे नाव त्यांचे आजोबा, म्हैसूर येथील शिक्षण महानिरीक्षक होर्मुसजी भाभा यांच्या नावावरून ठेवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com