नवाब मलिकांना जामीन शक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवाब मलिकांना जामीन शक्य
नवाब मलिकांना जामीन शक्य

नवाब मलिकांना जामीन शक्य

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे गंभीर आजारी आहेत. पीएमएलए कायद्यातील कलम ४५ नुसार त्यांना जामीन मिळू शकतो, असा दावा आज मलिक यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. या कायद्यानुसार आरोपीला जामीन मंजूर करण्यासाठी पुरेशी संयुक्तिक कारणे उपलब्ध असतील, तर जामीन मंजूर होऊ शकतो, असे मत ज्येष्ठ विधीज्ञ अमीत देसाई यांनी मांडले. यामध्ये गंभीर गुन्ह्यातदेखील विचार झाला आहे; जर खटल्याच्या सुनावणीला आरोपी हजर राहणार असेल, तर जामीन देण्यासाठी हरकत नसावी, असा युक्तिवाद त्यांनी केला.

मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत आणि कुर्ल्यामधील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी नियमित जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेला ईडीकडून विरोध करण्यात आला आहे. मलिक यांच्याविरोधात पुरेसा पुरावा उपलब्ध आहे, असा दावा तपास यंत्रणेने केला आहे आणि जामिनावर सोडण्यास मनाई केली आहे. पीएमएलए कायद्यानुसार मलिक गंभीर आजारी नसून, कारागृहात त्यांच्यावर उपचार होऊ शकतात, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. २४) या याचिकेवर पुढील सुनावणी होणार असून तपास यंत्रणा बाजू मांडण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?
मलिक यांनी कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या हस्तकांमार्फत कुर्ल्यामधील जमीन ताब्यात घेतली आहे, अशी तक्रार मूळ मालकाने केली आहे; तर संबंधित प्रकरण २० वर्षे जुने असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये मलिक यांना अटक करण्यात आली आहे.