सावत्र आईला घराबाहेर काढणाऱ्याला फटकारले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावत्र आईला घराबाहेर 
काढणाऱ्याला फटकारले
सावत्र आईला घराबाहेर काढणाऱ्याला फटकारले

सावत्र आईला घराबाहेर काढणाऱ्याला फटकारले

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : सावत्र आईला वडिलांच्या घरातून बाहेर काढणाऱ्या मुलांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. वृद्ध आईला या वयात शांतता आणि आराम मिळण्याची आवश्यकता आहे, असे खडे बोल सुनावत मुलांना घरातून बाहेर पडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
वडिलांच्या मृत्यूनंतर सन २०१४ मध्ये मुलांनी सावत्र आईला घराबाहेर काढले आणि घराचा ताबा स्वतःकडे घेतला. दोन्ही मुलांविरोधात सावत्र आईने ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल केली होती. मंचाने आईची तक्रार ग्राह्य ठरवून मुलांना घरातून बाहेर जाण्याचे निर्देश दिले आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी आईला समाधानकारक आणि शांततेत आयुष्य जगता यायला हवे, असे निरीक्षण मंचाच्या अध्यक्षांनी नोंदवले आहे. याविरोधात मुलांनी अपील याचिका केली होती. याचिकेवर न्या. आर. जी. अवचट यांच्यापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने तक्रार निवारण मंचचा निर्णय कायम ठेवला आहे. तसेच भविष्यात आईने संबंधित जागेबाबत कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नयेत, असे आदेश दिले आहेत. मुलगा या नात्याने संबंधित जागेवर मुलांचा अधिकार आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
---
मुलांचा आरोप काय?
वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर आईने आम्हाला मुलांसारखे वाढवले नाही आणि गावी आजीकडे पाठवून दिले; मात्र आजीचे निधन झाल्यानंतर आम्ही पुन्हा वडिलांकडे राहायला आलो, असा युक्तिवाद मुलांच्या वतीने करण्यात आला होता. वडिलांचे घर सध्या रिकामे आहे आणि आई तिच्या बहिणीकडे राहते. पत्नी या नात्याने ती घरात राहू शकते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.