सॅटेलाईट लावलेल्या दोन कासवांचा सुखरूप प्रवास सुरु

सॅटेलाईट लावलेल्या दोन कासवांचा सुखरूप प्रवास सुरु

सॅटेलाईट लावलेल्या दोन कासवांचा प्रवास सुखरूप
४० ते ४५ किमी अंतर कापल्याची मॅन्ग्रोव्हज् फाऊंडेशनची माहिती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मॅन्ग्रोव्हज् फाऊंडेशन महाराष्ट्र वन विभाग-रत्नागिरी विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी संयुक्त विद्यमाने ऑलिव्ह रिडले टर्टल सॅटेलाईट टॅगिंग प्रोग्रामअंतर्गत गुहागर समुद्रकिनाऱ्यावर बागेश्री आणि गुहा अशा दोन कासवांना उपग्रहाद्वारे टॅग केले. त्यानंतर त्यांना यशस्वीपणे समुद्रात सोडण्यात आले. त्यांचा प्रवास सुखरूप सुरू असून आठवडाभरात त्यांनी ४० ते ४५ किमीचा प्रवास केल्याची माहिती मॅन्ग्रोव्हज् फाऊंडेशनने दिली.

मॅन्ग्रोव्ह फाऊंडेशन, महाराष्ट्र वन विभाग-रत्नागिरी विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थेच्या टीम गुहागर समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालत असताना त्यांना तिथे घरटे बांधण्यासाठी आलेली दोन मादी ऑलिव्ह रिडले कासवे नजरेस पडली. घरटे बांधल्यानंतर त्यांना पकडून त्यांच्यावर सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवण्यात आले. त्यानंतर त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. सॅटेलाईट टॅगच्या माध्यमातून कासवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असून त्यामुळे त्यांचे विश्व उलगडण्यास मदत मिळणार आहे. दोन्ही कासवांना टॅगिंग केल्यानंतर २२ फेब्रुवारीला समुद्रात सोडण्यात आले. दोन्ही कासवांनी यशस्वीपणे आपला प्रवास सुरू केला आहे. दोन्ही कासवे किनारपट्टीपासून दूर गेल्यानंतर वेगवेगळा प्रवास करू लागली. बागेश्री कासव किनारपट्टीपासून ३० किमी दूर अंतरावर आहे. गुहा कासव ४५ किमी दूर गेले आहे.

कासवांच्या हालचालींचा अभ्यास
पाच कासवांना याआधी सॅटेलाईट टॅग बसवण्यात आले होते. त्यानंतर आता गुहागर समुद्रकिनाऱ्यावर दोन कासवांना टॅग लावण्यात आले आहेत. समुद्र किनारपट्टीवर अंडी घातल्यानंतर मादी कासवांच्या समुद्रातील प्रवासाची माहिती घेण्यासाठी भारतीय वन्य जीव संस्था असा प्रयोग करत आहे. कोकणातील सॅटेलाईट कनेक्शनचा प्रयोग यशस्वी झाल्यास मादी कासवांच्या एकूण हालचालींबाबतचा अभ्यास भारतीय वन्यजीव संस्थेच्या अभ्यासकांना करता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com