भारतीय शेअर बाजारांची आगेकूच कायम

भारतीय शेअर बाजारांची आगेकूच कायम

मुंबई, ता. ८ : अमेरिकी फेडरल बँकेच्या अध्यक्षांनी व्याजदरवाढीचे सुतोवाच करूनही आज भारतीय शेअर बाजारांनी आपली आगेकूच कायम ठेवली. शेअर बाजारांनी सलग तिसरी वाढ दाखवल्याने सेन्सेक्स १२३.६३ अंश, तर निफ्टी ४२.९५ अंशांनी वाढला.

या वाढीमुळे आज बीएसईवरील सर्व गुंतवणूकदारांची एकूण संपत्ती ८७ हजार कोटी रुपयांनी वाढली. काल बीएसईवरील सर्व शेअरचे एकूण मूल्य २६५.४२ लाख कोटी रुपये होते. ते आज २६६.२९ लाख कोटी रुपये एवढे झाले.

फेडरल बँकेचे चेअरमन जेरॉम पॉवेल यांनी आक्रमक व्याज दरवाढीचे समर्थन करताना अमेरिकी आर्थिक तपशील चांगला असल्याने चलनवाढीला आळा घालण्यासाठी आधी ठरवले होते, त्यापेक्षा जास्त व्याजदर वाढवणे आवश्यक होईल, असे विधान केले. त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय स्तरावरही सर्वच शेअर बाजार नरम-गरमच होते. त्यानुसार भारतीय शेअर बाजारात सुरुवातही थंड झाली, मात्र नंतर हळूहळू खरेदी वाढत गेली. त्यामुळे दिवसअखेरीस सेन्सेक्स ६०,३४८.०९ अंशांवर, तर निफ्टी १७,७५४.४० अंशांवर स्थिरावला.

आज आयटी आणि धातूनिर्मिती क्षेत्राचे शेअर घसरले, तर कॅपिटल गुड्स, ऊर्जा निर्मिती आणि वाहन निर्मिती कंपन्यांचे शेअर वाढले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि लार्सन टुब्रो यांना संरक्षण मंत्रालयाची कामे मिळाल्याने त्यांचे भाव आज वाढले. निफ्टीमधील इंडसइंड बँक सुमारे पाच टक्के वाढला; तर अदाणी एंटरप्राइजेस, अदाणी पोर्ट्स, बजाज ऑटो, महिंद्र आणि महिंद्र यांचेही भाव वाढले. निफ्टीमध्ये बजाज फायनान्स, टेक महिंद्र या शेअरचे भाव दोन टक्के घसरले आणि हिंदाल्को, इन्फोसिस, अपोलो हॉस्पिटल यांचे भावही घसरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com