हात धुवा, मास्क वापरा, काळजी घ्या!

हात धुवा, मास्क वापरा, काळजी घ्या!

मुंबई, ता. १२ : देशात एन्फ्लूएन्झाच्या ‘एच ३ एन २’ या नव्या विषाणूमुळे हरियाना आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. या आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. नीती आयोगाने या संदर्भात सर्व राज्यांच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेतली. त्यात सदर आजाराची तीव्रता आणि उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करण्यासह हात धुणे, स्वच्छता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच विषाणूचा सामना करण्यासाठी रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ, औषधसाठा, ऑक्सिजन तसेच अन्य उपकरणे सज्ज ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
सामान्यत: मे महिन्यात दिसणारे फ्ल्यूचे रुग्ण यंदा हवामान बदलामुळे लवकर आढळले आहेत. त्यातच ‘एच ३ एन २’ या नव्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य विभाग चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर नीती आयोगाने सर्व राज्यांना उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
---
काय आहेत मार्गदर्शक तत्त्वे?
१. लहान मुले, सहव्याधी असलेले वृद्ध रुग्ण आणि गरोदर महिला हे इन्फ्लूएन्झाच्या दृष्टीने सर्वाधिक जोखीम गट आहेत. त्यामुळे या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवावे.
२. आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करण्यासह वेळोवेळी हात धुण्यावर भर देण्यासाठी जनजागृती करणे. चाचण्यांचा अहवाल लवकर वेळीच देऊन योग्य उपचार करावे.
३. इन्फ्लूएन्झासारख्या आजाराची लक्षणे असलेल्या अधिकाधिक रुग्णांचे नमुने आणि तीव्र श्वसन संसर्गाचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत.
४. औषधे, वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन आदींसह रुग्णालयात उपचारांची तयारी करा.
---
नीती आयोगाकडून मिळालेल्या सूचनेनंतर, महापालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईतही तयारी सुरू केली आहे. रुग्णालये आणि डॉक्टरांना इन्फ्लूएन्झासारखे आजार तसेच श्वसनासंबंधित संशयित रुग्णांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंतच्या पाहणीत मुंबईत इन्फ्लूएन्झा किंवा तीव्र श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये कोणतीही वाढ दिसून आलेली नाही.
- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com