अनुदानित शाळा संपात जाण्याच्या तयारीत

अनुदानित शाळा संपात जाण्याच्या तयारीत

मुंबई, ता. १३ : जुन्या पेन्शन योजनेच्या विषयावर आज कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे उद्या (ता. १४) होणाऱ्या राज्यव्यापी संपात शिक्षकांनी बारावीची परीक्षा सुरळीत करून आपला सहभाग नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अनेक शिक्षकांनी सहमती दर्शवली असताना, अनुदानित संस्थाचालक आणि मुख्याध्यापक संघटनांनीही बेमुदत संपात सहभागी होणार असल्याचे जाहीर केल्याने त्याचा मोठा फटका शाळा आणि कामकाजावर बसण्याची शक्यता आहे.

बारावीच्या लेखी परीक्षेचे तीन पेपर बाकी असून ते सुरळीत होण्यासाठीची तयारी राज्यातील असंख्य शिक्षकांनी दर्शवली; तर काही शिक्षक संघटनांनी विद्यार्थी हित लक्षात घेऊन कोणत्याही विषयाचे पेपर अडचणीत येणार नाहीत, यासाठी शिक्षकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन शिक्षक संघटनांनी केले आहे. शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले, ‘‘आमचे शिक्षक परीक्षेच्या कामकाजात सहभागी होतील. विद्यार्थ्यांच्या अडचणी होऊ दिल्या जाणार नाहीत.’’

राज्यव्यापी संपात मुख्याध्यापक संघटना, तसेच महामुंबई संस्था चालक संघटनेनेही आपला सहभाग नोंदवत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनुदानित शाळांतील शिक्षक उद्यापासून शाळेत जाणार नाहीत. शाळेशी संबंधित कोणतीही कामे आम्ही करणार नाही. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही याचा निर्णय पालकांनी घ्यावा, असा इशारा या संस्थाचालक संघटनेने दिला आहे.


शिक्षकांची भूमिका विद्यार्थी हिताची आहे. पेन्शन योजनेचा विषय महत्त्वाचा असला तरी सध्या सुरू असलेल्या परीक्षा आणि त्यासाठीची विद्यार्थ्यांची तयारी खूप महत्त्वाची आहे. एकही विद्यार्थी आमच्या संपामुळे अडचणीत सापडणार नाही. यासाठी प्रत्येक शिक्षकाने खबरदारी घेतली पाहिजे. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांसोबत राहून सरकारला आमचा विविध मार्गाने रोष असल्याचे दाखवून देत राहू.
- सुधीर घागस, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com