श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी चंद्रपूरचे सागवान

श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी चंद्रपूरचे सागवान

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : चंद्रपूर जिल्ह्यात सापडणारे सागवान देशात सर्वोत्तम समजले जातात. अयोध्येत निर्माणाधीन श्रीराम मंदिरासाठी हे सागवान वापरले जाणार आहेत. सागवानाचे हे काष्ठ बुधवारी (ता. २९) अयोध्येला रवाना होणार आहे. त्यापूर्वी त्याची विधिवत पूजा करून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशहा डेपोतून श्रीराम मंदिरासाठी मिळणाऱ्या लाकडावर अभियंते आणि कलावंत नक्षीकाम करणार आहेत.

श्रीराम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर निर्माणाचे कार्य वेगाने सुरू आहे. एक हजार वर्षे या मंदिराची वास्तू उभी राहावी, यासाठी वास्तूतज्ज्ञांच्या मदतीने इमारत उभारण्यात येत आहे. यासाठी मंदिराच्या महाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा, मुख्य मंदिर वास्तूतील इतर दरवाजांसाठी सर्वोत्तम सागवान लाकडाची गरज आहे. मंदिर ट्रस्टने चंद्रपूरच्या सागवानाच्या नमुन्याची चाचणी घेतल्यावर हे काष्ठ सर्वोत्तम असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंदिर निर्माण समितीने मुनगंटीवार यांच्याकडे पत्राद्वारे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या डेपोतून सागवान काष्ठ पुरवण्याची विनंती केली होती. या संदर्भात वन मंत्र्यांनी सर्वोत्तम दर्जाचे सागवान काष्ठ अयोध्येला पाठवण्याकरिता नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. सागवान उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले आहे.

शोभायात्रेत लोककलांचे सादरीकरण
शोभायात्रेत महाराष्ट्रातील विविध लोककलांचे सादरीकरण होणार आहे. ४३ प्रकारच्या लोककला, रणवाद्य, योग मल्लखांब, दिंडी, लेझीम, आदिवासी कलाप्रकार, ढोलपथके, ध्वजपथकांचा यात समावेश असणार आहे. यामध्ये एक हजार स्थानिक; तर राज्यभरातून ११०० असे एकूण २१०० कलाकार हे सादरीकरण करतील.

चित्रपटसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती
शोभायात्रेत पूजन केलेल्या काष्ठांवर घराघरातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या शोभायात्रेत दिल्लीतील प्रजासत्ताक संचलनात पारितोषिक प्राप्त महाराष्ट्राचा ‘नारीशक्ती – साडेतीन शक्तीपिठे’ आणि उत्तर प्रदेशचा चित्ररथही सहभागी होईल. काष्ठ पूजन सोहळा आणि शोभायात्रेत अरुण गोविल, दीपिका, सुनील लहरी यांच्यासह हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत. योगगुरू स्वामी रामदेव बाबा, तसेच जग्गी वासुदेव आणि श्री श्री रविशंकर यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com