
एमबीए पुनर्परीक्षेसाठी ६ मे रोजी सीईटी
मुंबई, ता. २० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ३० एप्रिलला संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार असल्याने एमबीए, एमएमएस या व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या पुनर्परीक्षेसाठीची सीईटी ३० एप्रिलऐवजी ६ मे रोजी घेतली जाणार आहे. याबाबतची माहिती सीईटी सेलने दिली. या सीईटीसाठी १३ हजार २७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
दरम्यान, एमबीए, एमएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) २५ आणि २६ मार्च रोजी राज्यातील १९१ केंद्रावर घेण्यात आली; मात्र तांत्रिक कारणामुळे काही विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नाही. त्यामुळे ही पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी देण्यासाठी पुनर्परीक्षेची घोषणा करण्यात आली. या परीक्षेसाठी १३ हजार २७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यानुसार ही परीक्षा आता ३० एप्रिलऐवजी ६ मे रोजी सकाळी नऊ ते साडेअकरा या वेळेत घेतली जाणार आहे.
--
एलएलबीच्या सीईटीला ८५.८१ टक्के उपस्थिती
उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या पाच वर्षाच्या एलएलबीची सीईटीची परीक्षा बुधवारी घेण्यात आली. या परीक्षेला ८५.८१ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या परीक्षेला २२ हजार ४८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १९ हजार २९५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.