मराठीबाबत ‘सीबीएसई’ची तयारी होती!

मराठीबाबत ‘सीबीएसई’ची तयारी होती!

मुंबई, ता. २१ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) येत्या शैक्षणिक वर्षात आठवीसाठी मराठी भाषा विषय शिकवण्यासाठी सर्व तयारी केली होती. त्यासाठीच त्यांनी अभ्यासक्रम आणि वार्षिक आराखडाही नुकताच जाहीर केला होता; मात्र शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सीबीएसईला विश्वासात न घेता आठवीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी सक्तीतून वगळण्यासाठी मराठी भाषेला गुणांऐवजी श्रेणी देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
मागील काही दिवसांपूर्वीच सीबीएसईने आम्हाला वार्षिक अभ्यासक्रम आणि त्यासाठीच्या नियोजनाचा आराखडा जाहीर करून तो पालकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून दिला. शिवाय संकेतस्थळावरही तो प्रसिद्ध केला आहे. त्यात महाराष्ट्रात मराठी भाषा शिकवण्यासाठी तयारी दर्शवली होती; परंतु राज्य सरकारने सीबीएसईसह इतर केंद्रीय मंडळांच्या मुलांना आठवीच्या वर्गात विषय सक्ती आणि त्यासाठी मराठी भाषा विषयात गुणांऐवजी श्रेणी देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी किमान मुंबईतील मराठी पालकांना विचारात घेण्याची गरज होती; परंतु शालेय शिक्षण मंत्र्यांनी अमराठी मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरून घेतलेला निर्णय मराठी मुलांसाठीही घातक असल्याचे नवी मुंबई पालक संघटनेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी सांगितले.
दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल यासंदर्भात खुलासा करत केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये आठवीच्या यावर्षीच्या वर्गालाच (बॅच) गुणांकनाची सवलत देण्यात आली आहे. मराठी विषय वगळण्यात आलेला नाही, असे स्पष्ट केले असले, तरी याविरोधात मराठी भाषाप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने मराठी भाषा सक्तीतून केंद्रीय शाळांना वगळण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.
--
सीबीएसईला निर्णयाची माहितीच नाही
केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये आठवीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा विषयात गुणांऐवजी श्रेणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आत्तापर्यंत कोणतीच माहिती मंडळाला दिलेली नसल्याचे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. राज्य सरकारने त्यांच्या स्तरावर निर्णय घेतला असला, तरी पालक आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सीबीएसई कायम आपली भूमिका बजावत असल्याचेही सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com