ब्रिटिशकालीन जलवाहिन्यांच्या जिओपॉलियर अस्तराचे पुनर्वसन

ब्रिटिशकालीन जलवाहिन्यांच्या जिओपॉलियर अस्तराचे पुनर्वसन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : शहर विभागातील १०० वर्षे जुन्या, पण वापरात असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांच्‍या जिओपॉलियर अस्तराचे खंदकविरहित तंत्रज्ञानाधारे पुनर्वसन केले जाणार आहे. पुनर्वसनासह पाच वर्षे देखभाल करण्याच्या कामाचादेखील यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यात १४,२८५ मीटर लांबीच्या २७ जलवाहिन्यांचे पुनर्वसन केले जाणार असून, यावर ६३३ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

ब्रिमस्टोवॅड सल्लागारांनी १९९०-९१ मध्ये शहर आणि उपनगरातील पर्जन्य जलवाहिन्यांचे सर्वेक्षण केले होते. मुंबईच्या शहर परिसरातील पावसाचे पाणी १०० वर्षांहून अधिक जुन्या ब्रिटिशकालीन कमान पर्जन्य जलवाहिन्याद्वारे अरबी समुद्रात सोडले जाते. या प्रणालीची पद्धतशीर स्वच्छता, साफसफाई उपप्रमुख अभियंता (प्रचलन व परिरक्षण) पजवा विभागाद्वारे नियमितपणे केली जाते. या पर्जन्य जलवाहिनी प्रणालीचे सीसी टीव्हीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये अनेक ठिकाणी भेगा पडल्याचे, विटांचे विस्थापन झाल्याचे, मोटरचे नुकसान झाल्याचे आणि सिमेंट-काँक्रीटचा पृष्ठभाग तुटल्याचे आढळून आले.

शहर परिसरात सध्या ४९५ कि.मी. लांबीच्या भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची प्रणाली अस्तित्वात आहे. या विभागाने सीसी टीव्ही सर्वेक्षणाच्या अहवालाच्या आधारे केलेल्या निरीक्षणानुसार सध्याच्या ५६ कमान पर्जन्य जलवाहिन्या (२३, ५४८ मीटर लांबी) खराब आणि जीर्ण अवस्थेत आढळलेल्या आहेत. ५६ पैकी २७ (१४, २८५ मीटर लांबी) पर्जन्य जलवाहिन्यांची तसेच काही बॉक्स ड्रेनची तातडीने पुनर्वसन करण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे; अन्यथा या पर्जन्य जलवाहिन्यांवरील रस्त्याचा भाग कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कोसळू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील रस्त्यावरील वाहनांचा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते व त्या रस्त्यावरील रहदारी बंद पडण्‍याची शक्‍यता आहे.
------------------------
‘आयआयटी बॉम्बे’ची शिफारस
उर्वरित पर्जन्य जलवाहिन्यांचे पुनर्वसन टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी नेमणूक करण्यात आलेले सल्लागार मे. एमडब्ल्यूएच प्रा. लि. यांनी विद्यमान भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची प्रणाली सुरळीतपणे कार्यरत राहण्यासाठी आणि त्यांचे आयुष्यमान वाढवण्यासाठी पुनर्वसन करण्याचे सुचविले आहे. शिवाय ‘आयआयटी बॉम्बे’ने फेब्रुवारी-२०२१ च्या अहवालामध्ये ही जिओस्प्रे जिओपॉलिमर अस्तर तंत्रज्ञानाची शिफारस केली होती.
-----------------------
काम पूर्ण करण्याचा कालावधी ३६ महिने
जिओपॉलिमर अस्तर खंदकविरहीत तंत्रज्ञान भारतामध्ये प्रथमच वापरण्यात येत आहे. अशा प्रकारची कामे इतर देशांमध्ये मुख्यतः अमेरिकेत केली जातात. त्यामुळे कामाच्या निविदेस सर्वसाधारण कंत्राटाच्या अटी लागू करण्यात आल्या असून, त्यासाठी परकीय चलन घटकाचे सूत्र लागू करण्यात आले आहे. यानुसार या कामासाठी एकूण ६३३ कोटी ६८ लाख ८१ हजार ५१९ रुपये इतका खर्च करण्यात येत आहे. काम पूर्ण करण्याचा कंत्राट कालावधी ३६ महिने (पावसाळा वगळून) एवढा निश्चित करण्यात आला आहे.
.........
या आहेत अटी...
१. पर्जन्य जलवाहिन्यांच्या आतील बाजूस लावावयाचे जिओपॉलिमर अस्तर हे स्ट्रक्चरल स्‍टँडअलोन असेल.
२. नवीन तंत्रज्ञान माती आणि रहदारी यांचा एकत्रित भार घेण्यास तसेच पर्जन्य व मलनिस्सारण जलामुळे होणाऱ्या परिणामास प्रतिकार करण्यास सक्षम असेल.
३. स्थापित अस्तराचे किमान आवश्यक आयुष्यमान ५० वर्षे असेल.
४. पर्जन्य जलवाहिन्यांच्या जिओपॉलिमर अस्तर खंदकविरहीत तंत्रज्ञानाद्वारे करावयाच्या कामाचे संकल्पचित्रे व आराखडे सध्याच्या पर्जन्य जलवाहिन्या १०० टक्‍के खराब स्थितीत आहेत, असे गृहीत करणे बंधनकारक असेल.
५. कामासाठी वापरण्यात येणारे मटेरियल वॉटर रिसर्च सेंटर या संस्थेने पर्जन्य जलवाहिन्यांच्या पुनर्वसनाकरिता प्रमाणित केलेले असावे.
६. अस्तराचे संकल्पचित्रे व आराखडे यांचे परीक्षण आयआयटी बॉम्बे यांच्याकडून करून घेणे बंधनकारक असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com