५३ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेटविना

५३ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेटविना

मुंबई, ता. ३० : राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड शिक्षण विभागाशी जोडून ते अपडेट करण्यासाठी ३० एप्रिल रोजी अखेरची मुदत संपली. या मुदतीनंतरही तब्बल ५३ लाख १७ हजार ६०८ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट होऊ शकले नाहीत. यासाठी अनेक तांत्रिक बाबी असल्या तरी सर्वाधिक वाटा हा संस्थाचालकांकडून माहिती दडवण्याचा असल्याने राज्यात यानिमित्ताने पुन्हा संचमान्यतेचा मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्यातील शाळांमध्ये शिकत असलेल्या एकूण २ कोटी १३ लाख ८८ हजार १७७ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत १ कोटी ६० लाख ७० हजार ५६९ विद्यार्थ्यांचे म्हणजेच ७५.१४ टक्के आधारकार्ड अपडेट झाले आहेत. यामध्ये सर्वांत कमी आधारकार्ड अपडेट हे मुंबई उपनगरात केवळ ४९.९४ टक्के इतके झाले असून राज्यात सर्वाधिक जास्त आधार कार्ड नोंदणी अपडेट करण्यात सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असून तिथे ९२.५३ टक्के त्यानंतर रत्नागिरी ८९.४३ टक्के इतकी नोंदणी झाली आहे. त्यानंतर सातारा ८९.६, जळगाव ८८.९४, अहमदनगर ८६.३६, सांगली ८५.७२, अकोला ८२.६७, कोल्हापूर ८२.३६, यवतमाळ ८१.२५ टक्के इतके आधार कार्डचे अपडेट करण्यात आले आहेत.
अनुदानित शाळा संस्थाचालकांनी मागील काही वर्षांत अधिक नफा कमवण्याच्या उदेशाने एकाच वेळी अनुदानित आणि दुसरीकडे खासगी शाळा सुरू केल्या आहेत. खासगी शाळांतील मुलांनाच अनुदानित शाळांमध्ये दाखवून अनेक संस्थांनी अनुदानावर येत आपल्या नात्यागोत्यांना वेतनाचे अनुदान सुरू करून घेतले आहेत; मात्र आता शिक्षण विभागाने प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती आणि त्याचे आधार कार्ड अनुदानित शाळांसोबत अपडेट करण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांची माहिती लपवणाऱ्या अनेक संस्थांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी चालढकलपणा केला जात असल्याचे बोलले जात आहे.
--
मुंबईची नोंदणी सर्वांत कमी
विद्यार्थ्यांच्या आधार अपडेट करण्यात मुंबई शहर आणि उपनगर हे राज्यात सर्वांत पिछाडीवर राहिले आहे. यामध्ये मुंबई उपगरात अर्ध्याही विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट होऊ शकले नाही. केवळ ४९.९४ टक्के इतकेच अपडेट झाले असून शहरात ६२.६६ टक्के इतके झाले आहेत.
--
अनुदानित शाळांची अनागोंदी
मुंबई शहर आणि उपनगरातील अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये १७ लाख ९९ हजार ६९१ विद्यार्थी असून त्यापैकी अखेरच्या मुदतीपर्यंत १० लाख ४१ हजार २४ विद्यार्थ्यांचे आधार लिंक अपडेट झाले आहेत; तर उर्वरित ७ लाख ५८ हजार ६६७ विद्यार्थ्यांचे अपडेट बाकी राहिले असून यात सर्वाधिक अनुदानित शाळांतील विद्यार्थी असल्याने येत्या काळात या शाळांची नीट चौकशी झाल्यास मोठ्या प्रमाणावर अनागोंदी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
--
हजारो शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात
आधार कार्ड अपडेट न करणाऱ्या अनुदानित संस्थांवर तातडीने कारवाईचा भाग म्हणून त्यांचे अनुदान बंद केले जाईल. यामुळे राज्यात हजारो शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे; तर दुसरीकडे माहिती दडवणाऱ्या संस्थाचालकांवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com