मुंबईत दोन हजारांहून अधिक रुग्ण थॅलेसेमियाबाधित

मुंबईत दोन हजारांहून अधिक रुग्ण थॅलेसेमियाबाधित

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबई व एमएमआर विभागातील दोन हजारांहून अधिक नागरिक थॅलेसेमियाचे रुग्‍ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्‍य विभागाकडून प्राप्त झाली आहे. दरम्‍यान, बोरिवली येथील मुंबई पालिकेच्या थॅलेसेमिया सेंटरमध्ये ३६ रुग्णांवर बोनमॅरो ट्रान्सप्लांट केल्याने ते बरे झाल्याची माहिती थॅलेसेमिया उपचार केंद्राच्या संचालिका डॉ. ममता मंगलानी यांनी दिली आहे.
थॅलेसेमिया आजार हा आनुवंशिक असला तरी जन्माला येणाऱ्या बाळात थॅलेसेमिया आजाराचे निदान झाले तर काळजी घेणे गरजेचे आहे. थॅलेसेमिया आजार हा उपचारांनंतर बरा होतोच असे नाही, त्यामुळे अशा रुग्णांची विशेष काळजी घ्यावी लागते, अशी माहिती तज्‍ज्ञांनी दिली आहे.

बोनमॅरो ट्रान्सप्लांटचा विस्तार
सायन रुग्णालयात बोनमॅरो ट्रान्सप्लांट ही संकल्पना २० वर्षांपूर्वी राबवली. सद्यस्थितीत रोज ४ ते ५ जणांवर बोनमॅरो ट्रान्सप्लांट करण्यात येते, परंतु आता बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा विस्तार करण्यात येत असून तत्कालीन अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे सायन रुग्णालयात पुढील सहा महिन्यांत ५ पट बोनमॅरो ट्रान्सप्लांटची क्षमता वाढवण्यात येईल, अशी माहिती सायन रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे.

कसा होतो थॅलेसेमिया
प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात दोन जनुके असतात, जी शरीराला कमांड देतात, की हिमोग्लोबिन बनवा.
दोन जनुकांपैकी एक जनुक माता व एक जनुक पित्याकडून बाळाच्या शरीरात येते.
बाळाच्या शरीरात आई व वडील यांच्याकडून योग्‍य जनुक न आल्‍यास बाळाला थॅलेसेमिया आजार होतो.

आई व वडील दोघांना थॅलेसेमिया आहे अथवा नाही याची माहिती नसल्‍यास दोघांची रक्ततपासणी करण्यात येते. जर दोघांमध्ये त्‍या प्रकारचे जीन असेल तर बाळ जन्माला येण्याआधी गर्भाची चाचणी केली जाते आणि त्यानंतर अहवालामध्ये जन्माला येणाऱ्या बाळाला थॅलेसेमिया आजार आहे की नाही हे कळते.
- डॉ. ममता मंगलानी, संचालिका, थॅलेसेमिया उपचार केंद्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com