तपासात निष्काळजी करणाऱ्या पोलिसावर कारवाई करा!

तपासात निष्काळजी करणाऱ्या पोलिसावर कारवाई करा!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : अल्पवयीन मुलीवर धावत्या कारमध्ये बलात्कार केल्याच्या प्रकरणात निष्काळजीपणे तपास करणाऱ्या पोलिस निरीक्षकावर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिस आयुक्तांना दिले आहेत. संबंधित प्रकरणात स्वतः देखरेख करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

मानखुर्द पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात संशयित आरोपींची ओळख होऊ नये म्हणून तपास अधिकाऱ्याने त्यांची रीतसर ओळख परेड चाचणी केली नाही. अत्यंत निष्काळजीपणे आणि संकुचित वृत्तीने तपास हाताळला, अशी नाराजी न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली. बलात्कारासारख्या संवेदनशील प्रकरणात अशा गंभीर चुका तपासात केल्यामुळे आरोपीला जामीन मंजूर झाला, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले. पोलिस आयुक्तांनी व्यक्तिशः या प्रकरणात लक्ष घालावे आणि संबंधित तपास अधिकाऱ्यावर कारवाई करावी. त्याच्या व्यक्तिगत नोंदीमध्ये याचा उल्लेख नमूद करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

जुलै २०२० मध्ये घडलेल्या घटनेत पीडित मुलगी संध्याकाळी मैत्रिणीकडे गेली होती. तिथून येताना तीन जणांनी तिला घरी सोडतो असे सांगून आपल्या कारमध्ये बसवले; मात्र त्यांनी ती कार चेंबूर व वडाळा अशा ठिकाणी फिरवून चालत्या गाडीत तिच्यावर बलात्कार केला आणि तिला एका रस्त्यावर उतरवले. मुलीने आपल्या आत्याला सर्व प्रकार सांगितल्यावर पोलिस तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गाडी व अन्य वर्णनावरून आरोपींना अटक केली. तीन आरोपींपैकी दोघांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. तिसऱ्या आरोपीला काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला आहे.

ओळख परेड आवश्यक
मी आरोपींना यापूर्वी पाहिले नाही. ते एकमेकांना नावाने हाक मारत होते, असे पीडित मुलीने दंडाधिकारी न्यायालयात सांगितले होते. आरोपींना ती ओळखत नसल्याने नियमानुसार त्यांची योग्य प्रकारे ओळख परेड करणे आवश्यक होते. संबंधित कारची तपासणी करून पुरावे शोधणे आणि ज्या पेट्रोल पंपावर गाडी थांबली होती तिथे तपास करणे अपेक्षित होते; मात्र पोलिसांनी अत्यंत ढिसाळपणे तपास करून आरोपींची नियमित ओळख परेड केली नाही आणि तपासात त्रुटी ठेवल्या, असे सुनावत न्यायालयाने सर्व प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com