सीईटीच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये बदल

सीईटीच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये बदल

मुंबई, ता. ३० : राज्य सीईटी सेलने विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता काही अभ्यासक्रमांच्या यापूर्वी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश फेऱ्या दोनऐवजी तीन घेतल्या जाणार आहेत. फेऱ्या ‍वाढल्याने त्याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मागील काही वर्षांत सीईटी सेलअंतर्गत असलेल्या विविध विभागांच्या प्रवेश प्रक्रियेतील कालावधीत कपात करून तीनऐवजी दोन प्रवेशाच्या फेऱ्या राबवण्यात आल्या होत्या. त्यामुळे यंदा यात बदल करत पूर्वीप्रमाणे प्रवेशाच्या तीन फेऱ्या केल्या जाणार आहेत. सीईटी सेलच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या प्रवेश फेऱ्यानंतर अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहातात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना या फेऱ्यांचा लाभ होणार आहे. राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. विविध फेरीतून प्रवेश निश्चित करून जागा भरल्या जातात.
एमएचटी सीईटी अंतर्गत होत असलेले अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या प्रवेशाच्या तीन फेऱ्या गतवर्षी घेतल्या होत्या. मात्र, बीएड/एमएड (एकात्मिक) तीन वर्षे अभ्यासक्रम, एमएड द्विवर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रम, बीपीएड द्विवर्षीय, विधी पाच वर्ष, विधी तीन वर्ष, बीए/बीएस्सीबीएड (एकात्मिक) चार वर्ष, बीएड द्विवर्षीय सामान्य व विशेष, एमपीएड द्विवर्षीय पदव्युत्तर अशा अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेऱ्या दोनच झाल्या होत्या. दोन वर्षे कोरोनामुळे लांबलेले प्रवेश कमी कालावधीत पूर्ण करण्यासाठी हे नियोजन करण्यात आले होते. यंदा मात्र सर्वच प्रवेश प्रक्रिया तीन फेरीत पूर्ण करण्याचा विचार सीईटी सेलकडून केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला असून मंजुरी मिळाल्यानंतर सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे वेळापत्रक दिले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com