सायकल कट्ट्यातून सामाजिक प्रश्नांना हात , सायकलिस्ट कडून अनोखा उपक्रम

सायकल कट्ट्यातून सामाजिक प्रश्नांना हात , सायकलिस्ट कडून अनोखा उपक्रम

सायकल कट्ट्यातून समाज प्रबोधनाला गती!
मुंबईतील ‘सायकलिस्ट’ तरुणांचा अनोखा उपक्रम

मिलिंद तांबे, मुंबई
सायकल चालवण्याकडे आपण विरंगुळ्याचे साधन म्हणून पाहतो; मात्र मुंबईतील काही तरुण सायकलिंगचा वापर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी करत आहेत. आठ वर्षांपासून ‘सायकल कट्टा’ आयोजित करून ते जनजागृती करत आहेत. केवळ सायकलिंगचे महत्त्वच तरुण सांगत नसून पर्यावरण संरक्षण, प्रदूषण, शहर नियोजन, महिला सुरक्षा इत्यादी महत्त्वाचे विषयही हाताळले जात आहेत.
--
सायकलिंग करणाऱ्या काही तरुणांनी २०१५ रोजी ‘सायकल कट्ट्या’ची स्थापना केली. सायकलिंग करता करता समाज प्रबोधन करण्याचा त्यांचा उद्देश होता. सुरुवातीला कट्ट्यावर ६० ते ७० जण जमले. तेव्हा कट्ट्यावर शहर नियोजन विषयातील तज्ज्ञांना बोलावून चर्चा घडवण्यात आली. त्यातूनच ‘सायकल कट्ट्या’च्या माध्यमातून विविध मान्यवरांना बोलावून अनेक विषयांवर ऊहापोह होऊ लागला, असे संस्थापक सदस्य आशीष आगाशे यांनी सांगितले.
‘सायकल कट्टा’ संकल्पना यशस्वी झाल्यानंतर तो निरंतर सुरू करण्याचा विचार पुढे आला. त्यातूनच निदान तीन महिन्यांतून एकदा कट्टा आजोजित करण्याचे ठरले. कोविड काळात त्यात काहीसा खंड पडला. कोविड सरल्यानंतर आता पुन्हा कट्टा ट्रॅकवर येऊ लागला आहे. मागील कट्टा मार्च महिन्यात झाला. आता पावसाळ्यात एखादा कट्टा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे आगाशे म्हणाले.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अभिनयाव्यतिरिक्त सायकल चालवण्याची आवडही जोपासते. तिच्यासह अनेक मान्यवरांनी ‘सायकल कट्ट्या’वर हजेरी लावली आहे. अशाच प्रकारे अभिनेते, खेळाडू आणि अधिकारी येऊन कट्ट्यावर मनमोकळ्या गप्पा मारतात. कट्ट्याच्या कक्षा विस्तारण्याचा प्रयत्न आहे. कट्टा सध्या मुंबई आणि नवी मुंबईपुरता मर्यादित असला तरी त्याचे सदस्य विविध ठिकाणचे आहेत. काही सदस्य तर राज्याबाहेरीलही आहेत. त्यामुळे शक्य झाल्यास वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये कट्टा आयोजित करण्याचा मानस आहे, असेही आगाशे यांनी स्पष्ट केले.
‘सायकल कट्टा’ कोणत्याही खर्चाशिवाय घेतला जातो. सुरुवातील एखाद्या हॉलमध्ये कट्टा भरल्याने तीन-चार हजार रुपये खर्च आला होता; पण कोणताही प्रायोजक किंवा कुणाकडूनही देणगी न घेता कट्टा आयोजित करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे जागा उपलब्ध होईल तिथे कट्टा घेतला जात आहे. कट्ट्यासाठी कुणाही समोर हात न पसरण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे कट्ट्याचे आयोजक प्रशांत ननावरे यांनी
सागितले.

सदस्यसंख्या दोन हजार पार
‘सायकल कट्ट्या’ने सध्या चळवळीचे रूप घेतले आहे. कट्ट्यातील महिला सदस्यांचे प्रमाणही २० टक्क्यांच्या वर आहे. सध्या फेसबुक, व्हॉट्सॲप इत्यादींसारख्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधला जात आहे. त्या माध्यमातून कट्ट्याची सदस्यसंख्या २३०० च्या वर गेली आहे. अनेक जण ‘सायकल कट्टा’ फेसबुक पेजवरून जोडले गेले आहेत. पुढेही कट्ट्याचा विस्तार करून तिथे विविध राजकारणी आणि सेलिब्रेटी आणण्याचा आयोजकांचा विचार आहे, प्रशांत ननावरे म्हणाले.

सायकलिंगला चांगले दिवस
सायकलिंगबाबात जनजागृती होत आहे. अनेकांना सायकलिंगचे महत्त्वही पटलेले आहे; पण प्रत्यक्ष आचरणात आणण्यात ते कमी पडत आहेत. मात्र हळूहळू बदल होत आहे. पर्यावरण संरक्षण, प्रदूषण कमी करणे आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी सायकलिंगचा वापर वाढला आहे. त्यामुळे चित्र बदलत असून सायकलिंगला चांगले दिवस आले आहेत, असे कट्ट्यातर्फे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com