मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी अखेर रवींद्र कुलकर्णी यांचीच वर्णी

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी अखेर रवींद्र कुलकर्णी यांचीच वर्णी

मुंबई ता. ६ : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी अखेर माजी प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांचीच वर्णी लागली आहे. कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी ही नियुक्त्ती जाहीर केली. कुलकर्णी यांच्याविरोधात अनेक तक्रारी आल्याने ती नियुक्ती लांबणीवर पडली होती. त्यांच्याऐवजी इतर नावांचीच चर्चा सुरू होती. मात्र, आज कुलकर्णी यांचेच नाव जाहीर झाले.

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुरेश गोसावी यांची; तर कोकण कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून डॉ. संजय भावे यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी मागील पाच वर्षे मुंबई विद्यापीठात प्र-कुलगुरू म्हणून कामकाज पाहिले होते. ते इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कुलगुरूपदासाठी प्राध्यापक संघटनांपैकी मुक्टा आणि इतर संघटनांनी विरोध दर्शवला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर नोंदवलेल्या आक्षेपांचा आधार घेत तसेच त्यांनी खरेदी केलेल्या महागड्या गाडीची चौकशी प्रलंबित असल्याने त्यांची कुलगुरूपदी नियुक्ती केली जाऊ नये, अशी मागणी राज्यपालांकडे केली होती. मात्र, आता राज्यपालांनी त्यांच्या नावाची घोषणा केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विद्यापीठातील कर्मचारी-अधिकारी संघटनांनी मात्र कुलकर्णी यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.
डॉ. सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ. संजय भावे हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात ॲग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.
--
प्र-कुलगुरूपदी कोणाची वर्णी?
कुलगुरूपदी डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या नियुक्तीनंतर आता प्र-कुलगुरूपदी कोणाची वर्णी लागेल, याविषयी विद्यापीठात चर्चा सुरू झाली आहे. सध्या प्रभारी कुलसचिव म्हणून आणण्यात आलेले आणि कायम वादात सापडलेले सुनील भिरूडही त्या पदावर कायम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे प्राचार्य आणि संस्थाचालकांमध्ये दबदबा असलेले डॉ. अजय भामरे यांच्यासारखे प्र-कुलकुरू विद्यापीठाला मिळावेत, अशी मागणी यापूर्वीच केली जात आहे. सध्या त्यांच्याकडेच या पदाचा कार्यभार आहे. दुसरीकडे अर्धा डझनहून अधिक उमेदवार प्र-कुलगुरूपदाच्या शर्यतीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com