मॅनहोलबाबत विशेष विभाग सुरू करणार का?

मॅनहोलबाबत विशेष विभाग सुरू करणार का?

मॅनहोलबाबत विशेष विभाग सुरू करणार का?
न्यायालयाचा महापालिका प्रशासनाला सवाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका तातडीने उघड्या मॅनहोलबाबत काय उपाययोजना करणार आहे आणि याबाबत विशेष विभाग सुरू करणार का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने आज केला.
उच्च न्यायालयाने यापूर्वी खड्डे आणि मॅनहोलसंबंधित दिलेल्या आदेशांवर अद्याप महापालिकेने कोणतीही कारवाई केली नसून ठिकठिकाणी उघडी मॅनहोल असल्‍याचे निदर्शनास आणणारी अवमान याचिका ॲड. रुजू ठक्कर यांनी केली आहे. खड्डेदुरुस्ती आणि संबंधित कामांसाठी महापालिकेने नागरिकांसाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू करावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते; मात्र प्रत्यक्षात यावर अमंलबजावणी झालेली नाही, असे याचिकादाराने सांगितले.
महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी चालू वर्षी जानेवारीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जिओ तंत्रज्ञानाचा वापर करून मैनहोल व त्याची झाकण यावर देखरेख ठेवून प्रभागनिहाय याची पाहणी करण्यात येईल आणि झाकण चोरी झाली; तर कारवाई करण्यात येईल; मात्र वांद्रेमधील एका ठिकाणी चार मॅनहोल उघडी असून धोकादायक ठरत आहेत, असे वृत्त प्रसिद्धिमाध्यमात आले होते. ठक्‍कर यांनी याची माहिती प्रभारी मुख्य न्या. नितीन जामदार आणि न्या संदीप मारणे यांच्या खंडपीठाला दिली. महापालिका केवळ कागदोपत्री कार्यवाही करत असून प्रत्यक्षात कोणतीही उपाययोजना केलेली नाही, असे त्यांनी सांगितले.
खंडपीठाने याची गंभीर दखल घेतली असून येणाऱ्या पावसाळ्याच्या दृष्टीने यावर तातडीने कार्यवाही करायला हवी, असे निरीक्षण नोंदविले. महापालिकेच्या विभागात समन्वयाचा अभाव दिसत आहे, याचिकेत उपस्थित अनेक मुद्दे आहेत; पण सध्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका जलदिनी विशेष यंत्रणा किंवा विभाग सुरू करणार का, याची माहिती प्रतिज्ञापत्रात दाखल करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

गंभीर दखल
मुंबईत एक लाखांहून अधिक मॅनहोल असून यात पर्जन्य वाहिनी विभागाच्या अखत्यारीत २५ हजार ६००; तर मलनिस्सारण विभागाच्या अखत्यारीत ७४,६८२ मॅनहोल आहेत. सहा वर्षे उलटून गेल्यानंतरही एक लाख मॅनहोलपैकी फक्त पाच हजार मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात उघडी मॅनहोल मुंबईकरांसाठी मृत्यूचे दार ठरू शकते. याबाबत न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

पर्जन्य जलवाहिन्या विभाग
एकूण मॅनहोल - २५ हजार ६००
संरक्षक जाळ्या बसवल्या - ३ हजार
---
मलनिस्सारण विभाग
शहर - २७,०७८
पूर्व उपनगर - १५,९८३
पश्चिम उपनगर - ३१,६२१
एकूण मॅनहोल - ७४,६८२
संरक्षक जाळ्या बसवल्या - १,९००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com