उकाडा वाढला,  मुंबईकर डिहायड्रेट

उकाडा वाढला,  मुंबईकर डिहायड्रेट

उकाड्यामुळे मुंबईकर डिहायड्रेटने त्रस्‍त
दिवसाला ८ ते १० रुग्ण दाखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : पावसाळ्यात पोटासंबंधी संसर्ग, अन्नावाटे होणारी विषबाधा, डेंगी, मलेरिया किंवा चिकनगुनियाचा धोका असतो; मात्र पावसाने विश्रांती घेताच वाढलेल्या उष्णतेमुळे आता डिहायड्रेशनच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसाला ८ ते १० रुग्ण ओपीडीमध्ये दाखल होत आहेत. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आणि हायड्रेट राहणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
डिहायड्रेशनची समस्या सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये आढळून येऊ शकते. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांवर याचा गंभीर परिणाम होतो. अतिसार आणि उलट्या हे लहान मुलांमध्ये डिहायड्रेशनला कारणीभूत ठरतात. लहान मुलांमध्ये, तोंड कोरडे पडणे, जीभ तसेच डोळे कोरडे होणे, ऊर्जेची पातळी कमी होणे आणि सतत चिडचिड होणे, अशी लक्षणे दिसून येतात. याउलट प्रौढांमध्ये लघवीचे प्रमाण कमी होणे, डोकेदुखी, गडद रंगाची लघवी, थकवा येणे आणि गरगरणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.

पावसाळ्याच्या दिवसातही भरपूर पाणी पिणे तितकेच गरजेचे आहे. अचानक बरसणारा पाऊस आणि उच्च आर्द्रतेच्या पातळीमुळे बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो, की वारंवार पाणी पिण्याची गरज नाही; मात्र यामुळे पावसाळ्यातही डिहायड्रेशनच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
- डॉ. ऊर्वी महेश्वरी, इंटरनल मेडिसिनतज्‍ज्ञ, झायनोव्हा शाल्बी मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय

पावसाळ्यात हवामान खूप थंड असते; पण आता तापमान अचानक बदलल्यामुळे अनेकांना डिहायड्रेशन, चक्कर येणे, उलट्या होणे आणि व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होतो. अशा वातावरणात स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
- डॉ. छाया वजा, जनरल फिजिशियन

वातावरणात बदल
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे (वाढलेली उष्णता) ओपीडीमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी ८ ते १० रुग्ण डिहायड्रेशनची समस्या घेऊन येत आहे. याशिवाय अनेकांना व्हायरल इन्फेक्शन, चक्कर येणे, उलट्या होणे याचादेखील त्रास होत आहे. या ऋतूत निर्जलीकरणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांपैकी एक म्हणजे अतिघाम. काहीशा शारीरिक श्रमानंतरही अस्वस्थ वाटू लागते तसेच थकवा येतो. पावसाळ्यात तापमानात घट होते. त्यामुळे अनेक जण कमी पाणी पितात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढल्याने अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागला असल्‍याचे तज्‍ज्ञांनी सांगितले.

काय कराल?
दिवसभर भरपूर पाणी प्या
आहारात द्रव पदार्थांचा समावेश करा
काकडी, कलिंगड, संत्री आणि स्ट्रॉबेरी यांसारखी फळे खा
शहाळ्याचे पाणी, ताक किंवा लिंबू सरबत यांचेही सेवन करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com