
पूर्व मुक्त मार्ग, द्रुतगती मार्गावर चक्काजाम
वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचा बोजवारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील कार्यकर्ते आझाद मैदानात दाखल होत असून गुरूवारी (ता.२८) मुंबईतील वाहतूकीचे नियोजन वा बदल करणे आवश्यक होते, मात्र ते वेळेत न केल्यामुळे मुंबईतील वाहतुकीचा बोजवारा उडाला.
आंदोलकांचा वाहनांचा ताफ्यामुळे पूर्व मुक्त मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग या दोन्ही मार्गांवर सायंकाळच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली होती तसेच पूर्व मुक्त मार्गावर एका पिकअप वाहनाचा अपघात झाल्याने त्यात आणखी भर पडली त्यामुळे यामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. पूर्व मुक्त मार्गावर आंदोलनासाठी आलेल्या वाहनांची पार्किंग कॉटन ग्रीन आणि शिवडी परिसरात करण्यात आली आहे. त्याचा फटका पूर्व मुक्त मार्गावरील वाहतुकीला बसला तसेच पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या संख्येने वाहन आल्याने त्या ठिकाणीही वाहतूक खोळंबली. दरम्यान गुरुवारी रात्रभर मराठा आंदोलक विविध वाहनांने मुंबईत दाखल होण्याचे सत्र सुरू आहे. या आंदोलकांना फ्री वे पासून रोखण्यात येत असले तरी फ्री वे पुलाखाली ठिकठिकाणी वाहनांना पार्किंग करू देण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे पुलाखालचे रस्ते आतापासून ब्लॉक झाले आहे. शिवडी, वडाळा येथील फ्री वे येणाऱ्या पॉइंटवर वाहनांची तोबा गर्दी झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी मुंबईत जाणाऱ्या वाहनचालकांना दक्षिण मुंबईत मोठी ट्राफिक कोंडीला सामोरे जावे लागेल, अशी परिस्थिती आहे.
वाहतूकीचे व्यव्यस्थापन नाही
मी अडीच तासांपासून पी डिमेलो मार्गावर एकाच ठिकाणी अडकलो. महत्वाचे म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईबाहेरून आंदोलक याच मार्गावरुन मुंबईत दाखल होणार असल्याचे पोलिसांना माहिती असूनही ट्राफिकचे व्यव्यस्थापन नव्हते. अडकलेल्या प्रवाशांना कुठलीही माहिती मिळत नव्हती, हे भीषण आहे.
असल्याची प्रतिक्रिया या वाहतूक कोंडीत अडकलेला एका नागरिकाने दिली.