भायखळ्यातील राणीची बाग सजणार ‘मुंबई पुष्पोत्सवा’ने
भायखळ्यातील राणीची बाग सजणार ‘मुंबई पुष्पोत्सवा’ने
निसर्गप्रेमींसाठी पर्वणी; पाच हजार फुलांची मेजवानी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबईकरांचे लाडके पर्यटनस्थळ असलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) येत्या ६ फेब्रुवारीपासून ‘मुंबई पुष्पोत्सवा’चा सुगंध दरवळणार आहे. महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या या २९व्या उद्यानविद्या प्रदर्शनाचे उद्घाटन ६ फेब्रुवारीला सकाळी होणार असून, ८ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन करण्यात येत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर रात्री ८ वाजेपर्यंत तर ७ आणि ८ फेब्रुवारीला सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत नागरिकांना या पुष्पोत्सवाचा आनंद घेता येईल. या प्रदर्शनात सुमारे पाच हजार प्रकारची रंगीबेरंगी फुले, फळझाडे, औषधी वनस्पती आणि विविध ऋतूंमध्ये बहरणारी दुर्मिळ रोपे मांडली जाणार आहेत. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे हे प्रदर्शन एका आकर्षक संकल्पनेवर (थीम) आधारित असेल.
धावपळीच्या मुंबईत निसर्गाचा गारवा देणाऱ्या या सुगंधी पर्वणीचा लाभ मुंबईकरांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.
विशेष कार्यशाळा
केवळ प्रदर्शनच नव्हे तर पर्यावरणप्रेमींसाठी या ठिकाणी विशेष कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये घरगुती बागकाम, झाडांची निगा आणि खतांचा वापर याविषयी तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाईल. तसेच उद्यानविषयक साहित्य आणि रोपांच्या खरेदीसाठी स्वतंत्र दालने उपलब्ध असतील.
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

