भटक्या प्राण्यांना अन्न दिल्यास दंड!
भटक्या प्राण्यांना अन्न दिल्यास दंड!
पालिकेच्या नव्या नियमांविरोधात प्राणीमित्र आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : महापालिकेने स्वच्छतेच्या नावाखाली अधिसूचित केलेल्या नव्या नियमावलीमधील दंडात्मक तरतुदींमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पक्षी व भटक्या प्राण्यांना अन्न दिल्यास ५०० रुपये आणि पाळीव प्राण्यांनी सार्वजनिक ठिकाणी शौच केल्यास १,००० रुपये दंड आकारण्याच्या निर्णयावर प्राणीप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हा निर्णय ‘अमानवी’ असल्याची टीका केली आहे.
यासंदर्भात इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल प्रोटेक्शन, अम्मा केअर फाउंडेशन आणि पॉज मुंबई या संस्थांच्या वतीने सुनिष सुब्रमण्यन कुंजु यांनी महापालिका आयुक्तांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. केवळ दंड आकारून समस्या सुटणार नसून, त्यातून मनमानी कारवाई वाढण्याची भीती या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
संघटनांनी आपल्या निवेदनात संविधानाच्या अनुच्छेद ५१अ (ग) चा दाखला दिला आहे. प्रत्येक नागरिकावर सजीव प्राण्यांप्रती करुणा बाळगण्याची मूलभूत जबाबदारी असताना, त्यांना अन्न देण्यापासून रोखणे किंवा दंड लावणे हे घटनात्मक मूल्यांच्या विरोधात आहे. पालिकेने आधी आहार क्षेत्र आणि स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे ठरवून द्यायला हवी होती, असे संघटनांचे म्हणणे आहे.
पाळीव प्राण्यांच्या मालकांवर दंड लावताना शहरात त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा आहेत का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र फिरण्याची ठिकाणे, कचरा कुंड्या आणि सूचनाफलक उपलब्ध नसताना थेट दंडात्मक कारवाई करणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
स्वच्छ शहर आणि करुणाशील समाज हे एकमेकांच्या विरोधात नसून, योग्य नियोजनाद्वारे दोन्ही साध्य होऊ शकतात, असा विश्वास सुनीश कुंजू यांनी व्यक्त केला आहे. आता या निवेदनावर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संघटनांच्या प्रमुख मागण्या
– पक्षी आणि भटक्या प्राण्यांसाठी अधिकृत आहार क्षेत्र निश्चित करावेत.
– दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी व्यापक जनहितार्थ जनजागृती मोहीम राबवावी.
– पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र नागरी सुविधा उभारण्यात याव्यात.
– अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राणी कल्याणाबाबत संवेदनशील प्रशिक्षण द्यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

