जेवणानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

जेवणानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Published on

जेवणानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

मृतांमध्ये आई-वडिलांसह दोन मुलींचा समावेश

विषबाधा, सामूहिक आत्महत्या की घातपात?

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः सहकुटुंब रात्री एकत्र जेवण, फलाहार केल्यानंतर अत्यवस्थ झाल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी पायधुनीतील घाटी मोहल्ल्यात घडली. मृतांमध्ये आई-वडील आणि दोन लहान मुलींचा समावेश आहे. या कुटुंबाला अन्नातून विषबाधा झाली का? जुन्या वैमनस्यातून अन्नात विष घालून या कुटुंबाला ठार करण्यात आले की वैयक्तिक वा व्यावसायिक अडचणींमुळे या दाम्पत्याने मुलींना ठार करीत स्वतः आत्महत्या केली, या सर्व शक्यता तपासल्या जात असल्याचे पायधुनी पोलिसांनी सांगितले. तूर्तास पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.
अंधेरी येथे मोबाईलशी निगडित वस्तूंचा व्यवसाय करणारे अब्दुल कादर डोकाडिया (वय ४०), पत्नी नसरीन (वय ३५), थोरली मुलगी आयेशा (वय १६) आणि धाकटी मुलगी जैनब (वय १३) अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंब घाटी मोहल्ल्यातील मोगल इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहत होते. अब्दुल आणि त्यांचे तीन भाऊ आसपासच वास्तव्यास आहेत. नसरीन यांनी शनिवारी रात्री घरी बिर्याणीचा बेत आखला होता आणि अब्दुल यांनी तिन्ही भावांना जेवणासाठी घरी आमंत्रित केले. त्यानुसार दोन भाऊ आणि तीन पुतणे संध्याकाळी दाखल झाले. रात्री ९च्या सुमारास सर्वांचे जेवण आटोपले. त्यानंतर त्यांच्यात निवांत गप्पाही झाल्या. १० वाजता पाहुणे आपापल्या घरी निघून गेल्यानंतर मध्यरात्री दीडच्या आसपास डोकाडिया कुटुंबाने कलिंगड खाल्ले आणि झोपी गेले.
पहाटे साडेचारच्या सुमारास मळमळ होत असल्याने अब्दुल यांना जाग आली. झोपेतून उठताच त्यांना अतिसाराचा त्रास सुरू झाला. तोपर्यंत पत्नी व मुलींना कोणताही त्रास झाला नाही. अब्दुल यांनी नेहमीच्या डॉक्टरांकडून औषधे घेतल्यावर थोडे बरे वाटल्याने त्यांनी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला; मात्र काही तासांनी संपूर्ण कुटुंबालाच अतिसाराचा त्रास सुरू झाला. धाकटी मुलगी जैनब बेशुद्ध पडल्याने अब्दुल यांनी आपल्या भावंडांना, नातेवाइकांना मदतीसाठी बोलावले. त्यांनी या चौघांना सबसिद्धिक रुग्णालयात नेले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सर्वांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. जे. जे.त पोहोचेपर्यंत जैनबचा मृत्यू झाला. पुढे नसरीन आणि आयेशा यांचाही मृत्यू झाला. दरम्यान, रविवारी रात्री ११च्या सुमारास अब्दुल यांचीही मृत्यूशी झुंज संपली.
----
कलिंगड ठरले निमित्त?
पोलिसांनी नोंदवलेला हा घटनाक्रम पूर्णपणे अब्दुल यांच्या जबाबावर अवलंबून आहे. पोलिस अब्दुल यांच्या घरात घडलेली प्रत्येक घडामोड, दोन भाऊ आणि तीन पुतण्यांकडून जाणून घेणार आहेत. अन्नातून विषबाधा झाली असावी, या प्राथमिक अंदाजावरून पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांमार्फत बिर्याणी, कलिंगडासह घरातील अन्य खाद्यपदार्थांचे नमुने गोळा केले. या नमुन्यांच्या चाचणीसह चौघांचे शवचिकित्सा अहवाल, व्हिसेरा तपासणी, रासायनिक चाचण्यांतून चौघांचा मृत्यू नेमका कलिंगडामुळे झाला का, ते स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
-----
विविध दृष्टिकोनातून तपास
उपचारादरम्यान अब्दुल यांनी दिलेल्या जबाबातून हा घटनाक्रम समोर आला आहे. त्यांनी दिलेला प्रत्येक तपशील तपासून खात्री केली जाईल. विषबाधेव्यतिरिक्त अन्य दृष्टिकोनातूनही तपास केला जाईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
---
परिसरातील कलिंगडे गायब
पायधुनीतील विषबाधेच्या घटनेची बातमी प्रसारमाध्यम, समाजमाध्यमांवरून वेगाने सर्वदूर पसरली. तसेच कलिंगडाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने सोमवारी या परिसरातील छोट्या-मोठ्या फळविक्रेत्यांनी कलिंगड न विकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कलिंगड कोणी घेणार नाही, मग ठेवून काय फायदा, असे पायधुनीतील एका फळविक्रेत्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com