रस्ते सुरक्षेचे आव्हान कायम

रस्ते सुरक्षेचे आव्हान कायम
Published on

रस्ते सुरक्षेचे आव्हान कायम
मुंबईत अपघात आणि जखमींची वाढ; मृत्यूंमध्ये मात्र घट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या २०२४ च्या अहवालानुसार मुंबईत रस्ते अपघात आणि जखमींच्या घटनांमध्ये वाढ दिसून आली आहे, तर मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे.
मुंबईत २०२४ मध्ये एकूण २,६०४ अपघात नोंदले गेले, ज्यात ३७० जणांचा मृत्यू झाला आणि २,७२२ जण जखमी झाले. २०२३ मध्ये ३८४ मृत्यू झाले होते. अपघातांच्या संख्येत २.८ टक्क्यांची आणि जखमींमध्ये चार टक्क्यांची वाढ, तर मृत्यूंमध्ये ३.६ टक्क्यांची घट दिसून आली.
देशातील १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ५० शहरांच्या तुलनेत मुंबई अपघातांच्या संख्येनुसार अकराव्या क्रमांकावर आहे. मृत्यूंमध्ये ती सोळाव्या क्रमांकावर असून, जखमींमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्येही मुंबईत सर्वाधिक अपघात आणि जखमींची नोंद होत असल्याने रस्ते सुरक्षा आव्हान बनली आहे. अहवालात आढळलेली परिस्थिती चिंताजनक आहे. अपघातांची संख्या आणि जखमींचे प्रमाण वाढत असताना मृत्यू कमी आहेत.
अपघात रोखण्यासाठी अहवालात प्रभावी वेग नियंत्रण, सुरक्षित पायाभूत सुविधा उभारणी आणि वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी या तीन बाबींवर भर देण्याची शिफारस करण्यात आली आहे. शहरात पायी चालणाऱ्यांसाठी चौरस सुरक्षित क्रॉसिंग, सायकल आणि मोटारसायकलसाठी स्वतंत्र लेन आणि रस्त्यांवरील प्रकाशसंकेत व चिन्हांची दुरुस्ती आणि स्पष्टता ही व्यवहार्य उपाययोजना आहेत. तसेच, ड्रायव्हर्ससाठी जनजागृती मोहिमा, ड्रायव्हिंग शिक्षण आणि निषेधात्मक दंडविनियम अंमलात आणल्यास वेग आणि मानवी चुका कमी होण्यास मदत होईल.
२०३० पर्यंत रस्ते अपघातांमधील मृत्यू आणि गंभीर जखमींची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. वैद्यकीय आरोग्य व्यवस्थेच्या क्षमतेत वाढ, अपघातस्थळी जलद प्रतिसाद आणि दीर्घकालीन वाहतूक नियोजन करणे आवश्यक आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांच्या रस्ते अपघात अहवाल २०२३ नुसार रस्ते अपघातात झालेल्या मृत्यूंमध्ये दुचाकी आणि तीनचाकी वाहनचालकांचा वाटा ४८ टक्के होता. दुचाकी आणि तीनचाकी वाहनचालकांच्या १७९ मृत्यूंपैकी १६५ दुचाकी चालक आणि १४ तीनचाकी (ऑटो रिक्षा) प्रवासी होते. २०१५ पासून पादचाऱ्यांच्या मृत्यूमध्ये ५७ टक्के घट झाली आहे.
२०२३ मध्ये रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यूंमध्ये दुचाकी आणि तीनचाकी वाहनचालक (४८ टक्के) आणि पादचाऱ्यांचा (४० टक्के) वाटा सर्वाधिक होता. ८९ टक्के मृत्यू पादचारी, दुचाकी आणि तीनचाकी वाहनचालक आणि सायकलस्वार यांचे झाले.

अपघाती मृत्यूमध्ये पादचाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. पादचाऱ्यांनी चालताना नेहमी उजव्या बाजूने चालावे, रस्ता ओलांडताना दक्ष असावे. पादचाऱ्यांचा निष्काळजी केल्यास त्यांच्या जीवावर बेतू शकते.
- डॉ. शंकर विश्वनाथ,
वाहतूकतज्ज्ञ

मुंबईमध्ये मृत्यूंच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली असली, तरी अपघात आणि जखमींच्या संख्येत झालेली वाढ ही चिंताजनक बाब आहे. सुरक्षित पदपथ, पादचारी क्रॉसिंग, चौकांवरील वेग नियंत्रण, वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि रस्त्यांची सुरक्षित रचना यांवर भर दिल्यास अपघात आणि मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यास मदत होऊ शकते.
- सुशील पठारे, वाहतूक अभ्यासक

मुंबईतील रस्ते अपघात : २०२४
- एकूण अपघात : २,६०४
- मृत्यू : ३७०
- जखमी : २,७२२

२०२३च्या तुलनेत
- अपघातांमध्ये २.८% वाढ
- जखमींमध्ये ४% वाढ
- मृत्यूंमध्ये ३.६% घट

देशातील ५० मोठ्या शहरांमध्ये मुंबईचे स्थान
- अपघातांमध्ये : ११ वा क्रमांक
- मृत्यूंमध्ये : १६ वा क्रमांक
- जखमींमध्ये : ९ वा क्रमांक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com