एसटीच्या खरेदीत आर्थिक लूट?

एसटीच्या खरेदीत आर्थिक लूट?
Published on: 

एसटीच्या खरेदीत आर्थिक लूट?
सुट्या भागांच्या खरेदीत अनियमिततेचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसगाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या सुट्या भागांची खरेदी बाजारभावापेक्षा तब्बल ३० टक्क्यांहून अधिक दराने केला जात असल्याने महामंडळाला आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.

वडेट्टीवार यांनी ११ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्यमंत्री व परिवहनमंत्र्यांना पत्र देऊन एसटीच्या सुट्या भागांच्या खरेदी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. महामंडळाच्या वरिष्ठ स्तरावर निविदा प्रक्रिया रखडवून स्थानिक आगार आणि मध्यवर्ती कार्यशाळांच्या पातळीवर जाणीवपूर्वक ही अंदाधुंद खरेदी सुरू असल्याचा आरोप पत्रातून करण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुट्या भागांची महत्त्वाची खरेदी प्रक्रिया जाणीवपूर्वक थंड बस्त्यात ठेवण्यात आल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. कायदेशीर निविदा प्रक्रियेद्वारे स्पर्धात्मक दर निश्चित करण्याऐवजी स्थानिक स्तरावर बाजारभावापेक्षा सुमारे ३० टक्के अधिक दराने साहित्य खरेदी केले गेल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले. त्यामुळे एसटी महामंडळाची आर्थिक लूट होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. वडेट्टीवार यांनी सांगितले की, सहा महिन्यांपूर्वी १४ पुरवठादारांनी सुमारे १५ कोटी रुपयांच्या आर्थिक किमतीच्या कायदेशीर निविदा भरल्या होत्या, मात्र त्या निविदांच्या अंतिम मंजुरीसाठी महामंडळाच्या प्रशासनाकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पूर्वनियोजित कट!
व्यावसायिक नियमानुसार संबंधित निविदांवर वेळेत ठोस निर्णय होणे अपेक्षित असताना सहा महिन्यांहून अधिक काळ निर्णय न झाल्यामुळे त्या निविदांची वैधता संपुष्टात आली आहे. हा प्रशासकीय विलंब विशिष्ट कंत्राटदारांना फायदा मिळवून देण्यासाठी रचलेला पूर्वनियोजित कट आहे का, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. या रखड्डपटीला कारणीभूत असलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करून त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com