शेअर घोटाळ्याप्रकरणी ईडीचे छापे

शेअर घोटाळ्याप्रकरणी ईडीचे छापे
Published on: 

शेअर घोटाळाप्रकरणी ईडीचे छापे
सहा शहरांतील २९ ठिकाणी कारवाई
मुंबई, ता. १९ : व्हॉट्सॲप समूहांच्या माध्यमातून शेअर खरेदीचे प्रलोभन दाखवून भाव कृत्रिमरीत्या वाढवणे आणि त्यानंतर शेअर्सची विक्री करून गुंतवणूकदारांना नुकसान पोहोचवण्याच्या कथित प्रकारात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली. मुंबई विभागीय कार्यालयाने शुक्रवारी (ता. १६) मुंबई, नाशिक, अहमदाबाद, गांधीनगर, सुरत आणि भावनगर या सहा शहरांतील २९ ठिकाणी छापे टाकले आणि २०० कोटी रुपयांच्या ट्रेडिंग खाते गोठवली.
आर. एम. ड्रिप अँड स्प्रिंकलर्स सिस्टिम्स लिमिटेड आणि आर अँड बी डेनिम्स लिमिटेड या दोन सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर व्यवहारांशी संबंधित ही कारवाई आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत करण्यात आली. ईडीच्या तपासानुसार, एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत दोन्ही कंपन्यांनी निवडक व्यक्ती आणि संस्थांना तीन कोटी ५० लाखांहून अधिक शेअर्स व परिवर्तनीय वॉरंटचे वाटप केले, या व्यवहारांसाठीची मोठी रक्कम संबंधित व्यक्ती, कंपन्या आणि कर्जदात्यांच्या मर्यादित गटातून आली, त्यानंतर शेअरचे भाव वाढवले, मात्र शेअर्सची मालकी प्रामुख्याने त्याच गटाकडे राहिली. डिसेंबर २०२५ अखेरपासून फेब्रुवारी २०२६ पर्यंत ‘मल्टिबॅगर स्टॉक्स’सारख्या नावांच्या व्हॉट्सॲप समूहांतून किरकोळ गुंतवणूकदारांना दररोज शेअर खरेदीचे संदेश पाठवण्यात आले. हरियाणा आणि मुंबईतील इतर व्यक्तींच्या नावांवरील सिमकार्ड वापरून हे समूह गुजरातमधील भावनगरमधून चालवत असल्याचे तपासात समोर आले.

ट्रेडिंग खाती गोठवली
व्हॉट्सॲप, एक्स (ट्विटर), एसएमएस आणि अन्य माध्यमांतून प्रचार केल्याने शेअर्सची मागणी, किंमत आणि व्यवहारांचे प्रमाण वाढले, या वाढीचा फायदा घेत प्राधान्याने शेअर्स मिळवलेल्या व्यक्तींनी मोठ्या संख्येने गुंतवणूकदारांना शेअर्स विकल्याचा संशय आहे. छाप्यांमध्ये संबंधित लाभार्थ्यांनी कमी किमतीत शेअर्स मिळवून नंतर भाववाढीचा फायदा घेतल्याचे ईडीने म्हटले आहे. या कारवाईत संबंधित व्यक्ती आणि संस्थांची सुमारे २०० कोटी रुपयांची ट्रेडिंग खाती गोठवण्यात आली. तसेच महत्त्वाची कागदपत्रे, डिजिटल उपकरणे, शेअर व्यवहारांच्या नोंदी आणि मालमत्तेसंबंधी दस्तऐवज जप्त केले असून या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com