

आरोपींना सूत्रधारांकडून रिअल टाइम अपडेट्स
बातम्या पाहून पळून जाण्याच्या मार्ग बदलण्याच्या सूचना
टायगर गोळीबार प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार केल्यानंतर फरार झालेल्या तीन आरोपींना पोलिसांच्या तपासाची माहिती वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांच्या माध्यमातून तत्काळ (रिअल टाइम अपडेट्स) दिली जात होती. सूत्रधारांकडून ही माहिती एन्क्रिप्टेड इंटरनेट संदेश प्रणालीद्वारे आरोपींपर्यंत पोहोचवली जात होती. त्यामुळे आरोपी वारंवार प्रवासाचे मार्ग आणि वाहतुकीची साधने बदलत होते, अशी माहिती तपासातील सूत्रांनी शनिवारी (ता. २४) दिली.
गोळीबाराच्या घटनेचे वृत्तांकन सुरू झाल्यानंतर आरोपींना त्यांच्या सूत्रधारांकडून मोबाईलवरून सतत सूचना मिळत होत्या. वृत्तवाहिन्यांवर हल्ल्याची दृश्ये प्रसारित झाल्यानंतर एका प्रमुख संशयिताला, ‘तुमचे चेहरे दिसले आहेत, तिथून तातडीने निघून जा,’ असा संदेश मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवून सूत्रधार आरोपींना पोलिसांच्या तपासाची माहिती देत होते, असा संशय पोलिसांना आहे. गुन्हे शाखेने केलेल्या डिजिटल पुराव्यांच्या विश्लेषणातून रेहान हा इंटरनेटवर आधारित संदेश प्रणालीद्वारे सातत्याने आरोपींच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. ‘सिग्नल’ आणि ‘झांगी’ या ॲपच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक नोंदणीची आवश्यकता नसतानाही संपर्क साधता येतो. अशाच प्रकारच्या माध्यमांचा वापर आरोपींनी केल्याचा संशय पोलिसांना आहे. अंधेरी परिसरात हल्लेखोरांची दुचाकी सापडल्याची बातमी तसेच आरोपी रेल्वेने प्रवास करीत असल्याचे वृत्त सूत्रधारांकडून आरोपींपर्यंत तातडीने पोहोचवले जात होते. त्यामुळे पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपींनी दुचाकीनंतर रेल्वे आणि त्यानंतर टॅक्सीचा वापर केला. पुढे सुरत येथून बसने प्रवास करण्याची त्यांची योजना होती. मात्र, सुरत बस स्थानकावरील विलंबामुळे त्यांनी पुन्हा रेल्वेने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. मुंबई पोलिसांनी दिलेल्या सतर्कतेच्या सूचनेनंतर कोटा पोलिसांनी त्यांना रेल्वेतून ताब्यात घेतले.
लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध?
गोळीबारासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे कोठून मिळवण्यात आली, त्यांचा पुरवठा कोणी केला आणि आरोपींना पळून जाण्यासाठी कोणी मदत केली, याचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात १० जणांना राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या गोळीबाराची समाजमाध्यमांवरून कथित जबाबदारी घेणारा गँगस्टर अनिल पंडित याला मुंबई पोलिसांनी फरार घोषित केले आहे. तो लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा पोलिसांना संशय आहे. ही टोळी अमेरिकेतून कार्यरत असल्याचेही तपासातील सूत्रांचे म्हणणे आहे.
तिघांना पोलिस कोठडी
गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी विविध राज्यांमध्ये तपासाची चक्रे फिरवली. १९ ऑक्टोबरला राजस्थानमधील कोटा येथे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या तीन प्रमुख संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. फुलसिंग (१८), रेहान रहीसुद्दीन अन्सारी (१८) आणि ऋतिक महतो (२२) अशी त्यांची नावे आहेत. या तिघांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.