नायरच्या सात इमारतींना अग्निसुरक्षा

नायरच्या सात इमारतींना अग्निसुरक्षा
Published on: 

नायरच्या सात इमारतींना अग्निसुरक्षा
रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाय; पुढील पाच वर्षे संबंधित कंपनीकडून देखभाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः रुग्णालयांमधील आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महापालिका रुग्णालयांचे ऑडीट करण्यात आले असून, त्यामध्ये नायर रुग्णालयांच्या सातही इमारतींमध्ये अग्निसुरक्षेबाबतच्या त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे या सातही इमारतींमध्य प्रामुख्याने मॅन्युअल फायर अलार्म, कंट्रोल पॅनेल, बूस्टर पप, स्प्रिंकलर प्रणाली, स्मोक डिटेक्टर लावण्यात येणार आहेत. थेट रुग्णांच्या जीविताशी निगडित असल्याने अग्निसुरक्षा संबंधित ही कामे तातडीने करण्यात येणार आहेत. यासाठी ओमेक्स कंट्रोल सिस्टीम या कंपनीची निवड करण्यात येत असून, पुढील दोन वर्षांमध्ये हे काम पूर्ण झाल्‍यानंतर खऱ्या अर्थाने नायर रुग्णालय फायरप्रूफ बनले जाणार आहे.
सरकारी व खासगी रुग्णालयामध्ये आगीच्या दुर्घटना घडल्या असून, या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने विविध महापालिका रुग्णालयांची तपासणी केली. त्यात बहुतांश महापालिका रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा सुसज्ज नाहीत व काही ठिकाणी अग्निशमन यंत्रणा कार्यरत नाहीत, ही बाब समोर आली. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या निर्देशानुसार महापालिका रुग्णालयांशी संबंधित अग्निशमन यंत्रणाची कामे सुलभरीत्या पार पाडण्यासाठी उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली.
या आधीच्या बैठकांदरम्यान महापालिकेच्या विविध रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा यंत्रणांच्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी टप्पानिहाय आराखडा तयार करण्यात आला. यात टप्प्याटप्प्याने कामांची पूर्तता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभागाने नायर रुग्णालय येथे फायर ऑडिट करून त्यांचा अहवाल तयार केला.
नायर रुग्णालयाच्या आवारात एकूण सात इमारती असून, त्यांच्या अहवालानुसार सातही इमारतीमधील अग्निसुरक्षेबाबतच्या त्रुटींची पूर्तता तसेच पालन करण्याबाबत कळविले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मॅन्युअल फायर अलार्म, कंट्रोल पॅनेल, बूस्टर पंप, स्प्रिंकलर प्रणाली, स्मोक डिटेक्टर लावणे आवश्यक असल्याचे सूचित केले. त्यानुसार महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाच्या वतीने नायर रुग्णालयात अग्निसुरक्षा उपायोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी निविदा मागवली आहे. यामध्ये यासाठी ओमेक्स कंट्रोल सिस्टीम या कंपनीची निवड करण्यात आली असून, यावर सुमारे १८ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

अहवालानुसार काम करणार
नायर रुग्णालयात दररोज वॉर्ड, आयसीयू, ऑपरेशन थिएटर, अपघात विभागामार्फत अविरतपणे रुग्णांना सेवा दिली जाते. हे विभाग २४ तास कार्यरत असतात, त्यामुळे रुग्णसेवेची संबंधित विविध यंत्रे व संयंत्रे व उच्च विद्युत दाबावर चालणाऱ्या यंत्राचा सतत वापर सुरू असतो. तसेच दैनंदिन स्तरावर या रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णाची ये-जा सुरू असते. तसेच कार्यालयीन कामकाजाकरिता रुग्णालयातील कर्मचाऱ्याची उपस्थिती असते. फायर ऑडिट रिपोर्टच्या अहवालानुसार रुग्णालयामध्ये अग्निसुरक्षा प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही संबंधित कंपनी पुढील पाच वर्षे देखभाल करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.