धर्मापेक्षा माणुसकीला महत्त्व द्या

धर्मापेक्षा माणुसकीला महत्त्व द्या
Published on: 

धर्मापेक्षा माणुसकीला महत्त्व द्या

उद्धव ठाकरेंचे प्रतिपादन : ‘लाल देद : काश्मीरची आई’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, ता. १८ : “आम्ही कट्टर हिंदू आहोत; मात्र आमचे हिंदुत्व देशप्रेमाशी जोडलेले आहे. त्याची ओळख केवळ शेंडी, जानवे अशा बाह्य प्रतिकांपुरती मर्यादित नाही. धर्मापेक्षा माणुसकीला महत्त्व देणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

ज्येष्ठ पत्रकार व लेखिका डॉ. वैदेही तमन लिखित ‘लाल देद : काश्मीरची आई’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांच्यासह साहित्य, पत्रकारिता, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, काश्मीर आणि महाराष्ट्र यांच्यात आध्यात्मिक व सांस्कृतिक नाते आहे. संत कवयित्री लाल देद यांच्या विचारांत समाजाला जोडण्याची ताकद असून, त्यांच्या विचारांचा गाभा माणुसकी आहे. संत ज्ञानेश्वर आणि गाडगेबाबा यांच्या शिकवणीतही हाच मानवतावादी दृष्टिकोन दिसतो. देवाला नैवेद्य दाखवताना भुकेल्या माणसाची भूक भागवली जात नसेल, तर त्या भक्तीचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी केला.

सुख-दुःखाच्या प्रसंगी मन शांत ठेवून आत्मविश्वासाने संकटांचा सामना करावा, हा ज्ञानेश्वरांचा विचार असल्याचे नमूद करत त्यांनी तरुणांना आत्मविश्वासाचे महत्त्व पटवून दिले. काश्मीरमधील अस्थिरता आणि विस्थापनाच्या वेदनेचा उल्लेख करत सद्य:स्थितीचे आत्मपरीक्षण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. वैदेही तमन यांनी काश्मीरमध्ये प्रत्यक्ष प्रवास करून इतिहास, संस्कृती, संतपरंपरा आणि प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करत हे पुस्तक साकारले आहे. लाल देद यांच्या विचारांतून प्रेम, समता, आत्मशोध आणि बंधुभावाचा संदेश मिळतो, असे त्यांनी सांगितले.
-----
पुरस्कार प्रदान
पत्रकारिता, साहित्य, शिक्षण, वैद्यकीय सेवा, समाजसेवा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. नरेंद्र जाधव, अनिल गलगली, सीमा कपूर, भारती सहस्रबुद्धे, झेलम चौबळ, चाहत कुरेशी यांच्यासह विविध मान्यवरांना ‘लाल देद साहित्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. रुक्माबाई गोपालपुरी यांना सामाजिक कार्य आणि मानवसेवेतील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.