फणसाडमध्ये बिबट्याचे घर

फणसाडमध्ये बिबट्याचे घर

मुरूड, ता. ७ (बातमीदार) ः तालुक्यांतील फणसाड अभयारण्यात वन्यजीवांचा अनमोल ठेवा असून दोन दिवस अभयारण्यातील मचाणावर बसून १४ पाणवठ्यांवर येणाऱ्या पशू-पक्ष्यांची गणना करण्यात आली. या वेळी काही पाणवठ्यांवर बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या. याशिवाय भेकर, पिसोरी, रानमांजर, रानडुक्कर, रानगवा, मुंगूस, शेकरू तसेच विविध प्रकारचे पक्षी, सर्प, फुलपाखरे आढळल्‍याची माहिती फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर यांनी दिली.
महाराष्ट्रात एकूण पाच राष्ट्रीय उद्याने आणि ३३ आरक्षित अभयारण्ये संरक्षित क्षेत्र म्हणून अधिघोषित केली आहेत. कोकण किनारपट्टीलगत असलेले, हिरवाईने नटलेले फणसाड अभयारण्य ५४ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात फणसाड वनक्षेत्र जंजिरा संस्थानाचे राखीव शिकार क्षेत्र म्हणून केसोलीचे जंगल या नावाने ओळखले जायचे संस्थानचे नवाब सिद्दी यांच्या मालकीचे शिकार क्षेत्र म्हणून या जंगलाचा वापर व्हायचा. परिसरातील जैवविविधतेचे संरक्षण व्हावे आणि निसर्गाचा अनमोल ठेवा पुढच्या पिढीसाठी सुरक्षित राहावा, या उद्देशाने सरकारने २५ फेब्रुवारी १९९८ मध्ये फणसाड अभयारण्य म्हणून घोषित केले.
अभयारण्यातील वनस्पतींमध्ये आणि माथेरान-महाबळेश्वरसारख्या उंच ठिकाणी आढळणाऱ्या वनस्पतींमध्ये खूपच साम्‍य आढळते. जैवविविधतेच्या संवर्धनासाठी, जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यात या ठिकाणी १९९३ पासून अधिकारी, कर्मचारी नेमण्यात आले आहेत. शुष्क पानगळीचे व निम-सदाहरित प्रकारचे हे अभयारण्य आहे.
कांदळवनाचा (Mangroves) समावेश असलेले फणसाड हे महाराष्ट्रातील एकमेव अभयारण्य आहे. मुंबईपासून १५४ किलोमीटर अंतरावर असलेल्‍या या परिसरात पावसाची सरासरी ३२०० ते ३५०० मि.मी. नोंद होते.

राज्‍यप्राणी शेकरूचा अधिवास
फणसाड अभयारण्यात आजमितीस १७ प्रकारच्या सस्तन प्राण्यांची नोंद झाली असून महाराष्ट्र राज्याचे मानचिन्ह असणारा झुबकेदार शेपटीचा राज्यप्राणी शेकरूचे (मोठी खार) दर्शन येथील उंच तथा गर्द झाडीत होते. शेकरूची घरटी उंच झाडावर पानांनी मढवलेली वैशिष्ट्यपूर्ण असतात. रामप्रहरी वा सायंकाळी अभयारण्यात शिकारी प्राण्यांसह बिवट्याचे दर्शन होते.
भारतातील सर्वात मोठे हरिण व जगातील सर्वात छोटे हरिण पिसोरी हे दोन्ही अभयारण्यात आढळून येतात. एकमेव उडू शकणार सस्तन प्राणी वटवाघळाची पॅडेट बॅट या प्रजातीचीही इथे नोंद आहे. याशिवाय रानससे, साळिंदर, रानडुक्कर, मुंगूस, वानर, माकड, रानमांजर, तरस, कोल्हा, रानगवा आदी वन्यप्राणी आढळतात.

लक्षवेधी फुलपाखरे
अभयारण्यात ९० हून अधिक फुलपाखरांची नोंद करण्यात आलेली असून भीमपंखी फुलपाखरू तसेच ब्लू मॉरमान, ग्रास ज्वेल, कॉमन नबाब, प्लस ज्युडी, सायकी ही फुलपाखरे लक्ष वेधून घेतात.

दुर्मिळ वनौषधींचे माहेरघर
आजतागायत ७१८ प्रजातीच्या सपुष्प वनस्पतींची नोंद करण्यात असून दुर्मिळ आणि वनौषधींचे हे माहेरघर आहे. साग, किंजळ, अंजनी, सावर, जांभूळ, गेळा, कुडा, अर्जुन, कुंभा, ऐन अशी वृक्षसंपदा आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे जगातील सर्वात मोठी गारंबींची शेंग इथे पाहायला मिळते.

१६६ प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद
अभयारण्यात १६६ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद आहे. गिधाडे अन्यत्र नामशेष होणाच्या मार्गावर असले, तरी पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचे अस्तित्व या ठिकाणी टिकून दिसते. निळा माशीमार, पांढऱ्या गालाचा कटूरगा, पिवळ्या भुवयांचा बुलबुल, नीलदयाल, धीवर, धनेश आदी असंख्य पक्षीनिरीक्षणात नेहमीच आढळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com