साळाव पूल दुरुस्‍तीचा मुरूड आगाराला फटका

साळाव पूल दुरुस्‍तीचा मुरूड आगाराला फटका

मुरूड, ता. २९ (बातमीदार) ः रेवदंडा-साळाव पुलाचे काम सुरू झाल्यानंतर मुरूड आगारातील काही कर्मचाऱ्यांची अलिबाग येथे बदली करण्यात आली आहे. १० बस अलिबाग आगाराकडे वर्ग करण्यात आल्‍या आहेत. सध्या मुरूडसाठी १९ बस उपलब्ध असून या देखील वेळेवर येत नसून नादुरुस्‍त होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्‍यामुळे प्रवाशांचे हाल होत असून मुरूड आगार बंद होणार की काय? अशी भीती प्रवाशांमधून व्यक्‍त होत आहे.
मुरूड आगारातर्फे काही बस तात्पुरत्या कालावधीसाठी मुरूड-भालगावमार्गे तसेच मुरूड - साळाव-रोहामार्गे वळवण्यात आल्‍या आहेत, मात्र अपेक्षित उत्पन्नाच्या २५ टक्के इतकेच भारमान मिळाल्याचे कारण देत मोजक्याच बस मुरूडवरून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर उर्वरित बस अलिबाग आगराकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आल्‍या आहे. त्‍यामुळे मुरूड आगार बंद होणार की काय, अशी शंका प्रवाशांमधून व्यक्‍त करण्यात येत होती.
मुरूड-जंजिरा परिसरातील प्रवाशांचे दळणवळण अधिक प्रभावी असावे, यासाठी एसटी आगारांची निर्मिती महामंडळाने केली आहे. त्यामुळे एसटी डेपो बंद करण्यात येणार नसल्‍याची ग्वाही राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी यांनी मुरूड आगारात नुकत्‍याच झालेल्‍या आढावा बैठकीत दिली. पेण विभागीय नियंत्रक दीपक घोडे, यंत्र अभियंता पंकज ढावरे, आगार व्यवस्थापक नीता जगताप आदी यावेळी उपस्‍थित होते.
रेवदंडा-साळाव पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्‍याने ५ टन वजनापेक्षा अधिक अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यात प्रवासी एसटी सेवाही बंद पडल्याने नागरिकांना अलिबागपर्यंत प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. नांदगाव येथे सार्वजनिक बांधकाम खात्याने बाह्य वळणासह रस्ते रुंदीकरण करणे गरजेचे आहे. पुलाची दुरुस्‍ती होईपर्यंत एसटी वाहतुकीत तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात काही बदल करण्यात आल्‍याचे जोशी यांनी स्‍पष्‍ट केले.
राष्टवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मगेश दांडेकर, शहर युवा अध्यक्ष मनीष माळी, उपाध्यक्ष किरण नाईक, आदेश भोईर, शिवसेना शहर अध्यक्ष आदेश दांडेकर, ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद भायदे, विभाग प्रमुख योगेश सुर्वे, विजय सुर्वे आदींच्या शिष्‍टमंडळाने यावेळी एसटी प्रवाशांच्या समस्‍या मांडल्‍या.

प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड
रेवदंडा-साळाव पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मुरूडच्या एसटी प्रवासी सेवेवर परिणाम झाला आहे. थेट धावणाऱ्या मुंबई, पुणे, धुळे, औरंगाबाद अशी बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. साळाव ते मुरूड मार्गावरही वेळेवर बस उपलब्ध होत नसल्‍याने प्रवासी हैराण झाले आहेत. त्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना अतिरिक्‍त पैसे देत खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. एसटी प्रशासनाने मुरूड आगाराकडील सेवा अधिक सक्षम करताना प्रवाशांच्या हित जपावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मुरूड डेपो बंद करण्याचे कोणते प्रयोजन नाही. त्‍यामुळे अशा अफवांवर विश्‍वास ठेवू नये. मुरूड आगारासाठी १२ मीटर लांबीच्या १० बस मंजूर झाल्‍या आहेत. सद्य:स्थितीत आगारातून कोणकोणत्या मार्गावर लोकल आणि थेट प्रवासी सेवा सुरू असून किती भारमान मिळत आहे, याचा अहवाल त्वरित बनवण्याचे आदेश मुरूड आगारप्रमुखांना दिले आहेत. लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येतील.
- श्रीनिवास जोशी, उपमहाव्यवस्थापक, राज्य परिवहन महामंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com