सुगड बनवण्यासाठी कारागिरांची लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुगड बनवण्यासाठी कारागिरांची लगबग
सुगड बनवण्यासाठी कारागिरांची लगबग

सुगड बनवण्यासाठी कारागिरांची लगबग

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ९( वार्ताहर)ः मकर संक्रांतीला वाण देण्यासाठी महिलांना लागणारे सुगड बनवण्याची लगबग सध्या कुंभारवाड्यात सुरू आहे. विशेष म्हणजे कुंभार समाजातील नवी पिढी या व्यवसायात उत्साहाने सहभागी झाली आहे.
ग्रामीण भागात सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. सणातून रूढी-परंपरा जपण्याकडे अनेकांचा कल असतो. मकरसंक्रांतीसारख्या सणातूनदेखील प्रेम, आपुलकी, आदर व्यक्त करण्याची संधी मिळते. त्यामुळे महिलांसाठी हा सण विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सुवासिनी एकमेकींना वाण देतात. हे वाण ज्या मातीच्या भांड्यांमधून दिले जाते त्या सुगड बनवण्याची सध्या लगबग कुंभारवाड्यांमध्ये सुरू आहे. पनवेलमधील कुंभारवाड्यात ही सुगडी आणि बोळकी मोठ्या प्रमाणात बनवली जात आहेत. संक्रांतीनिमित्त या कामांना वेग आला असून कुटुंबातील इतर सदस्यही मदत करत आहेत.
-------------------------
व्यवसायाला आधुनिकतेची जोड
पूर्वी कुंभार मातीची भांडी बनवण्यासाठी हाताने फिरणाऱ्या चाकाचा उपयोग करीत होते. आता मात्र काही कुंभार वाड्यात विद्युत मोटारचा वापर केला जात आहे. मोटारीच्या साह्याने चाक फिरवले जात असल्याने हवी तशी मातीची भांडी तयार केली जातात. मात्र माठ, रांजण यांसारखी मातीची भांडी पारंपरिक पद्धतीनेच साकारली जातात.