मानवनिर्मित वणव्यांमुळे वनसंपदा धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानवनिर्मित वणव्यांमुळे वनसंपदा धोक्यात
मानवनिर्मित वणव्यांमुळे वनसंपदा धोक्यात

मानवनिर्मित वणव्यांमुळे वनसंपदा धोक्यात

sakal_logo
By

जव्हार, ता. १० (बातमीदार) : तालुक्यात खरीप हंगामाची शेतकामे आटोपल्यानंतर शेतमजूर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे धाव घेत असतात. तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी पाण्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे शेतीची कामे आटोपल्यानंतर जनावरांची विक्री केली जाते. तर जी जनावरे विकली जात नाहीत, अशी जनावरे रानात सोडली जातात. त्यामुळे रानात कुणीही फिरकत नाही. याच संधीचा फायदा घेत काही व्यक्ती जाणीवपूर्वक गवत जाळत आहेत, पण या आगीचे रूपांतर वणव्यात होत आहे. त्यामुळे या वणव्यात येथील वनसंपदा जळून खाक होत आहे.
जागतिक स्तरावर तापमानवाढ रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. यात वृक्षसंवर्धनाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी पर्यावरणाबाबत काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था, सरकारचा पर्यावरण विभाग प्रयत्नशील आहे. त्यांच्याकडून वनसंपदा टिकवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अलीकडच्या काळात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जमिनीची धूप तर होतेच, शिवाय पर्यावरणाचा ऱ्हासही होत आहे. पर्यावरणाचा संतुल राखायचा असेल, तर वृक्षसंवर्धन महत्त्वाचे आहे, पण मोठ्या प्रमाणात वनसंपदा लाभलेल्या जव्हार तालुक्यातील वृक्षांचे प्रमाण घटत चालले आहे. कारण माळरानावर तसेच जंगलात अनेकदा काही व्यक्ती जाणीवपूर्वक गवत जाळत आहेत. या आगीचे रूपांतर वणव्यात झाल्याने येथील वनसंपदा कमी होत आहे.
हिरवेगार दिसणारे डोंगर उन्हाळा वाढू लागल्यानंतर अचानक काळे दिसू लागले आहेत. उन्हाची तीव्रता वाढू लागल्यानंतर माळरानावर पसरलेले गवत सुकू लागले आहे. या सुकणाऱ्या गवताला अचानक वणवे लागत असून मानवनिर्मित या वणव्यांमुळे डोंगर काळवंडत आहेत. यामुळे वनराईने समृद्ध असलेले डोंगर, टेकड्या वणव्यामुळे ओसाड, उजाड होत आहेत. या वणव्यात मोठ्या वृक्षांच्या बरोबरीने लहान रोपांचीही हानी होत आहे. आंबे, काजू यासारखी फळझाडे करपून जात आहेत. यामुळे फळ पीक, मोहोर होरपळून जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वन्य प्राण्यांनाही या वनव्याच्या मोठ्या प्रमाणात झळा बसत असून त्यांचे अधिवास नष्ट होत आहेत.
....
आंबा, काजू पिकांचे नुकसान
गेल्या काही दिवसांपासून वणवे लागण्याचे प्रमाण वाढत असल्याने आंबा, काजू पिकांचे नुकसान होत आहे. नुकताच मोहर येऊ लागला आहे. या वणव्यांमुळे हा मोहर करपून जाण्याची शक्यता आहे. वनसंपत्तीबरोबर पशुपक्ष्यांना या वणव्याचा त्रास होतो आहे. वेळीच हे वणवे रोखले पाहिजेत, असे मत निसर्ग व पर्यटन संवर्धन संस्थेचे अध्यक्ष पारस सहाने यांनी व्यक्त केले.
...
तालुक्यात वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे डोंगर काळे दिसू लागले आहेत. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. त्यामुळे जनजागृती करून वणवे लावण्याचे प्रमाण रोखले पाहिजे.
- इमरान कोतवाल, निसर्गप्रेमी, जव्हार
.....
कोणत्याही प्रकारे आग लागू नये म्हणून मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ३ तीन मीटरपर्यंत स्वच्छता करण्यात येणार आहे. कोणतीही व्यक्ती वणवा लावताना प्रत्यक्ष आढळल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- दिनकर पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, मोबाईल पथक, जव्हार