
चार कोटींचे सोने जप्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दुबईहून मुंबईत ४.५५ कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण ८.३ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. हे दोन आरोपी वेगवेगळ्या विमानाने प्रवास करत होते. तथापि, त्यांचा हँडलर एकच एक दुबई येथील व्यक्ती होता. मोहम्मद सुलेमान आणि अब्दुल बासित अशी आरोपींची नावे असून त्यांना सोमवारी (ता. १७) मुंबई विमानतळावर रोखण्यात आले.
दिल्लीतील दर्यागंज भागातील रहिवासी असलेल्या सुलेमानची झडती घेतली असता त्याच्याकडे चार पाऊच सापडले. पाऊच उघडल्यानंतर त्यात अंगठीसह पेस्ट स्वरूपात सोने सापडले. त्याच्याकडून जप्त केलेले एकूण सोने ८.३ किलो होते. ज्याची किंमत सुमारे ४.५५ कोटी रुपये आहे. सुरुवातीला, दोन्ही प्रवाशांनी असा दावा केला की त्यांनी सोनेखरेदी कायदेशीररित्या केली आहे. परंतु, त्यांच्या दाव्यांना समर्थन देणारी कोणतीही कागदपत्रे किंवा पावत्या सादर करण्यात ते अयशस्वी ठरले. चौकशीअंती हे सोने दुबईतील एका व्यक्तीने भारतात तस्करीसाठी सुपूर्द केल्याचे उघड झाले. ज्याने सोने तस्करीसाठी भरघोस कमिशन देण्याचे आश्वासन दिले होते.