चांदिवलीतील रखडलेल्‍या विकासकामांसाठी नसीम खान आग्रही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांदिवलीतील रखडलेल्‍या विकासकामांसाठी नसीम खान आग्रही
चांदिवलीतील रखडलेल्‍या विकासकामांसाठी नसीम खान आग्रही

चांदिवलीतील रखडलेल्‍या विकासकामांसाठी नसीम खान आग्रही

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ ः साकीनाक्यात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी तसेच चांदिवली मतदारसंघातील रखडलेल्या विविध विकासकामांना गती देण्यासाठी मनपा उपायुक्त (परिमंडळ ५) यांच्या दालनात माजी मंत्री व प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. कुर्ला-अंधेरी रस्ता (साकीनाका ते बैल बाजार) रुंदीकरण व दुरुस्तीचे काम सन २०१८ पासून वारंवार निर्णय करूनही वेळेत पूर्ण न झाल्याने तेथे नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होते. साकीनाका परेरावाडी येथील झुंजार क्रीडा मैदानात प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचेही काम प्रलंबित आहे, असेही या बैठकीत खान यांनी दाखवून दिले.
चांदिवली फार्म रोड ते शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया येथील प्रस्तावित डीपी रोड पूर्ण करावा, मनुभाई चाळ ते जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला जोडणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्तीकरण व्हावे, सफेद नाल्यावरील पूल आणि अशोक नगर मारवा येथील हिंदू स्मशानभूमीजवळील पुलाचे काम पूर्ण करावे, मनीषा हॉटेल ते अंधेरी-घाटकोपर लिंक रोड पर्यंतच्या ९० फूट रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग हटवून रस्ता मोकळा करावा, संघर्ष नगरमधील शाळेची इमारत मनपाच्या ताब्यात घेऊन नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करावेत, तसेच रस्तादुरुस्ती आणि दिवाबत्तीची व्यवस्था करावी, चांदिवली मतदार संघात दत्तक वस्ती योजना प्रभावीपणे राबवून स्वच्छता करावी, पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करावी आदी मागण्या या वेळी खान यांनी केल्या. उपायुक्त हर्षद काळे यांनी लवकरात लवकर वरील सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.