हरवलेल्‍या मुलीचा आठ तासांमध्ये शोध

हरवलेल्‍या मुलीचा आठ तासांमध्ये शोध

कांदिवली, ता. ३० (बातमीदार) ः दहिसर येथून हरवलेल्‍या अल्पवयीन मुलीला एमएचबी पोलिस ठाण्याचे वरिष्‍ठ निरीक्षक सुधिर कुडाळकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आठ तासांमध्ये शोधले आहे. त्‍यानंतर आवश्यक बाबींची पूर्तता करून या मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. त्‍यावर पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
भावना चौधरी ही मुलगी रविवारी (ता. २९) घरातून ट्युशनला जाते असे सांगून निघून गेली होती. मात्र घरी न परतल्याने पालकांनी एमएचबी पोलिस ठाणे येथे तक्रार नोंदविली. त्‍यावर पोलिसांनी अपहरणाचा गुन्‍हा नोंद करत तत्‍काळ तपासाला सुरुवात केली. वरिष्‍ठ पोलिस निरिक्षक सुधिर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एमएचबी पोलिस ठाण्याचे पर्यवेक्षक सहायक निरिक्षक शीतल पाटील, रात्रपाळी पर्यवेक्षक पोलिस निरिक्षक नागटिळक, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहायक पोलिस निरिक्षक सूर्या पवार तसेच रात्रपाळी मोबाईल १ वरील स्टाफ व अधिकारी, रात्रपाळी निर्भया अधिकारी व पथकाने तत्काळ शोध सुरू केला. मुलीकडे मोबाईल नसल्याने तपासामध्ये अडथळे येत होते परंतु वेगवेगळे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून मुलीचा मागोवा घेतला. भावना बोरिवली रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची शक्यता वाटल्याने एमएचबी पोलिस पथक बोरिवली रेल्वे स्टेशन येथे गेले. तेथे ती आढळून आली. तिला आईवडिलांच्या समवेत पोलिस ठाणे येथे आणून तिच्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडला आहे की नाही याबाबत खात्री केली. तसेच तिची वैद्यकीय तपासणी करून तिला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

भावनाशी संवाद साधला असता ट्यूशन, अभ्यास, घरच्यांचा ओरडा या त्रागाने भटकत राहिल्याचे सांगितले. सुदैवाने काही अघटीत घटना घडली नाही.
– सुधिर कुडाळकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com