ठाणे लोहमार्ग गुन्हेगारीत वाढ

ठाणे लोहमार्ग गुन्हेगारीत वाढ

ठाणे, ता. ५ (वार्ताहर) ः ठाणे रेल्वे पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सन २०२२ या वर्षात ठाणे लोहमार्ग पोलिसांनी २८० सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. २०२२ च्या वर्षभरात मोबाईल चोरी, बॅग चोरी, भुरट्या चोरीचे १ हजार ५९९ गुन्हे नोंदवले गेले होते. यातील ४६३ गुन्ह्यांची उकल करण्यात यश आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.

ठाणे स्थानक हे जंक्शन असल्याने या स्थानकावर दहा फलाट आहेत. या स्थानकावरून ठाणे पूर्व आणि पश्चिम या ठिकाणाहून सकाळी-संध्याकाळी नौकरीनिमित्त आणि दिवसभर येणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात आहे. या रेल्वे स्थानक आणि आसपासच्या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून ठाणे लोहमार्ग पोलिस यांच्यासह रेल्वे सुरक्षा बल चोवीस तास कार्यरत असते. रेल्वे पोलिसांच्या हद्दीत, मारहाणीचे, विनयभंगाचे, हल्ल्याचे गुन्हे, मोबाईल चोरीचे गुन्हे, जबरी चोरीचे गुन्हे घडतात. सदरचे गुन्हे सराईत गुन्हेगार करतात. अशा सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधित कारवाई करून त्यांच्या गुन्हेगारी कारवायांना अटकाव करण्यात येतो.
---
रेल्वे रुळालगतच्या गुन्हेगारी कारवाया
रेल्वेच्या रुळालगत दबा धरून बसणारे आणि लोकलवर दगड भिरकावणाऱ्या प्रवृत्तींना शोधण्याचे मोठे आव्हान हे लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलासमोर आहे. हे गुन्हेगार गुन्हा करून शहरी भागात शिरकाव करीत असल्याने त्यांना शोधणे अवघड असते. खबऱ्यांच्या नेटवर्कचा वापर आणि पूर्वाश्रमीच्या गुन्हेगारांच्या पडताळण्या यासारखा खडतर प्रवास करावा लागतो. नुकतेच इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये महिलेशी दादागिरी करणाऱ्या त्रिकुटाला कर्जत रेल्वे पोलिसांनी अटक करून ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले; तर एका महिला पोलिस अंमलदाराचा डोळा दगड लागल्याने निकामी झाल्याची घटना घडली.
----
ठाणे रेल्वेत गुन्हेगारीत वाढ
ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या, भुरट्या चोऱ्या आणि इतर चोरींच्या प्रकरणात वाढ झालेली आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत २०२० मध्ये १५२ च्या तुलनेत २०२१ या वर्षात १४ ने वाढ झाली; तर २०२२ मध्ये ११६ गुन्ह्यांची विक्रमी वाढ झाल्याचे समोर आलेले आहे.
=====
सराईत गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा अधिकार हा लोहमार्ग सहायक आयुक्त यांच्या अखत्यारीत आहे; तर स्थानिक ठाणे लोहमार्ग पोलिस अशा गुन्हेगारांच्या प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव सादर केल्यानंतर गुन्हेगारांच्या गुन्ह्याच्या स्वरूपावरून करते. त्यांच्याकडून बॉण्ड घेऊन कारवाई होते. गुन्हेगारांना अटकाव करण्यात येतो. ही संख्या वाढत असली, तरीही कारवाईची संख्याही वाढते आहे.
- पंढरी कांदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ठाणे लोहमार्ग पोलिस ठाणे
-----
कारवाईचा आलेख
सन २०२०- १५२, सन २०२१-१६४, सन २०२२-२८०
------
२०२२ वर्षातील गुन्हे
प्रकार गुन्हे संख्या उकल संख्या
मोबाईल चोरी ---------------१,३३९----------------४१६
बॅग चोऱ्या --------------- ७६---------------- १२
भुरट्या इतर चोऱ्या ----------- १८४-----------------३५
एकूण - १,५९९-------------४६३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com