
शिवनेरी बसचे वाजले की बारा
ठाणे, ता. ६ : राज्य परिवहन महामंडळाच्या निमआराम सेवेने प्रवाशांना अनेक वर्षे तत्पर सेवा दिली. कालपरत्वे एसटी प्रशासनाने बदल स्वीकारून प्रवासीभिमुख सेवाही देण्याचा प्रयत्न केला. मात्र, बसची योग्य ती देखभाल न राखल्याने अशा बस आता प्रवाशांच्या अडचणीत भर टाकत आहेत. ठाण्यातील वंदना बसस्थानकातून रविवारी सकाळी आठ वाजता निघणारी ठाणे ते स्वारगेट ही शिवनेरी (वातानुकूलित) बस नियोजित स्थळी बारा वाजता पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, दरम्यानच्या प्रवासात वातानुकूलित बसचा कनेक्टर तुटल्याने बसमधील प्रवासी घामाघूम झाले. अखेर प्रवाशांच्या विनंतीनंतर पाठीमागून येणाऱ्या ‘अश्वमेध’ बसमधून काही प्रवाशांची इच्छितस्थळी रवानगी करण्यात आली. त्यानंतर ठाण्यातून शिवनेरीने निघालेले प्रवासी दीड वाजण्याच्या सुमारास पुण्यात दाखल झाले.
राज्य परिवहन महामंडळाने निमआराम (हिरकणी), वातानुकूलित सेवा, व्होल्वो वातानुकूलित सेवा (शिवनेरी), भाडेतत्त्वावरील वातानुकूलित सेवा (शिवशाही), शिवशाही स्लीपर कोच आदी सेवा सुरू केल्या. या बसला जादा दर देऊन चांगली सुविधा मिळत असल्यामुळे प्रवाशांमधून सर्वाधिक पसंती दिली जात होती. मात्र, आता अशा बसमध्ये असुविधा जाणवत असल्याने प्रवाशांना याचा आर्थिक फटका बसत असल्याचे समोर आले आहे.
रविवारी (५ फेब्रुवारी) ठाणे येथील वंदना बसस्थानकातून सकाळी आठ वाजता ठाणे ते स्वारगेट (एमएच ११ टी ९२४५) अशी शिवनेरी (वातानुकूलित) बस सोडण्यात आली. या बससाठी प्रतिप्रवासी ५१५ रुपये तिकीट आकारण्यात आले. नियोजित वेळापत्रकानुसार ही बस बारा वाजेपर्यंत स्वारगेट बस स्थानकात पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, बसने काही अंतर पार केल्यावर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्यानजीक बसच्या वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे भर उन्हामध्ये प्रवाशांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. बसच्या काचा बंद असल्याने बसमधील एका महिलेची प्रकृतीही बिघडली. काही वेळाने उकाडा असह्य झाल्याने प्रवाशांच्या विनंतीनंतर बस द्रुतगतीवर थांबविण्यात आली. प्रवासी खाली उतरले. अखेर चालकाने पाठीमागून येणाऱ्या ‘अश्वमेध’ बसमधून काही प्रवाशांना पुढील प्रवासासाठी रवाना केले.
दरम्यान, ठाणे ते स्वारगेट मार्गावर धावणारी ‘शिवनेरी’ बसचे आयुर्मान संपले असून, पुढील महिन्याच्या एक तारखेपासून या बस प्रवासासाठी बंद होणार असल्याचे बसचालकाने सांगितले. हे उत्तर ऐकताच बसप्रवाशांनी चक्क कपाळाला हात लावला. भरभक्कम तिकीट दराची आकारणी करून दुय्यम दर्जाची सेवा देणाऱ्या एसटी प्रशासनाबाबत प्रवाशांकडून तीव्र शब्दांत संताप व्यक्त करण्यात आला. ‘स्क्रॅप’ बसबाबत वंदना बस स्थानकाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अधिक बोलणे टाळले. शिवनेरी किंवा शिवशाही बस रस्त्यात नादुरुस्त झाल्यास मागून येणाऱ्या मार्गावरील व्होल्वो एसी किंवा साध्या बसमधून प्रवाशांना मार्गस्थ करण्यात येते. नादुरुस्त बस ही नजीकच्या डेपोत दुरुस्त करण्यात येते, अशी माहिती वंदना आगारातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
------------------------------------
कोट
मला रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास असल्याने अधिक पैसे खर्च करून मी नेहमी वातानुकूलित बसने प्रवास करते. मात्र, परिवहन मंडळाच्या रविवारी ठाणे ते स्वारगेट ‘शिवनेरी’ बसची वातानुकूलित यंत्रणा वाटेतच बंद पडल्याने मला प्रचंड मनस्ताप झाला. शिवाय नियोजित वेळेत न पोहोचल्यामुळे आर्थिक फटकाही बसला.
- संध्या आळवे, किसननगर ठाणे
--------------------------------
नाईलाज म्हणून खासगीचा पर्याय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास योजना सुरू केली. त्याबरोबर ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून ५० टक्के सवलत जाहीर केली. याचा सकारात्मक परिणाम एसटीच्या दैनंदिन प्रवासी संख्येवर झाला आहे. मात्र, सुसज्ज बस उपलब्ध नसल्यास अगदीच नाईलाज म्हणून प्रवासी खासगी पर्यायांकडे वळतात.