गुन्हेगारांवर सीसीटिव्हीचा वॉच

गुन्हेगारांवर सीसीटिव्हीचा वॉच

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ६ ः महापालिका क्षेत्रात अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यास अखेर सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच शहरातील महत्त्वाच्या अशा ठिकाणांवर तब्बल दीड हजार कॅमेऱ्यांचा खडा पहारा राहणार असून अद्ययावत स्वरूपाच्या या कॅमेऱ्यांमुळे नवी मुंबई पोलिसांना विविध गुन्हेगारी घटनांची उकल अधिक जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील वर्दळीच्या ठिकाणांवर पालिकेकडून अद्ययावत सीसी टीव्हीची यंत्रणा बसवण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर शहराच्या सुरक्षेवर अधिक भर दिला आहे. याच अनुषंगाने १५०० हून अधिक सीसी टीव्ही कॅमेरे नवी मुंबई पालिका क्षेत्रात ठिकठिकाणी बसवण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत शहरातील मुख्य चौक, बस डेपो, मार्केट्स, उद्याने, मैदाने, नाके, वर्दळीची ठिकाणे, नमुंमपा कार्यालये, पामबीच, ठाणे-बेलापूर रोड, सायन-पनवेल असे जास्त रहदारीचे रस्ते येथे हाय डेफिनेशन कॅमेरे बसवण्यात येत आहेत. आतार्यंत ४८४ कॅमेरे बसवण्यात आले असून त्यामधील १९ कॅमेरे प्रायोगिक स्वरूपात कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी शहर अभियंता संजय देसाई, तसेच अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत केली.
-----------------------------
सीसी टीव्ही यंत्रणेचे फायदे ः
-नवी मुंबई महापालिकेतील २४ ट्रॅफिक जंक्शनवर पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम बसवण्यात येत आहे. यामुळे आपत्कालीन व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यावश्यक क्षणी नागरिकांकरिता सीसी टीव्ही नियंत्रण कक्षातून महत्त्वाच्या सूचना देणे शक्य होणार आहे.
- या सीसी टीव्ही प्रणालीच्या मुख्य केंद्रीय नियंत्रण कक्ष उभारणीचे काम महापालिका मुख्यालय येथे सुरू असून हा नियंत्रण कक्ष नवी मुंबई पोलिस आयुक्तालय येथील विशेष कक्षाशी जोडलेला असणार आहे. अशाच प्रकारचा निरीक्षण कक्ष वाहतूक पोलिस उपायुक्त कार्यालय, तसेच पोलिस उपआयुक्त परिमंडळ १ यांच्या कार्यालयातही असणार आहे.
- या सर्व सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरणाची नियंत्रण कक्षातील संग्रहण क्षमता ३० दिवसांची असणार असून या प्रणालीमध्ये महत्त्वाचे प्रसंग, घटना यांचे चित्रीकरण स्वतंत्रपणे संग्रहित ठेवण्याची सुविधा आहे.
--------------------------------
सागरी किनाऱ्यावर करडी नजर
नवी मुंबई महापालिका क्षेत्राला लाभलेला विस्तारित सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ९ थर्मल कॅमेरे बसवण्यात येत आहेत. याशिवाय पोलिस विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे ९६ इव्हिडन्स कॅमेरे हे २४ मुख्य ट्रॅफिक जंक्शनवर बसवण्यात येत असून २८८ एएनपीआर म्हणजेच ॲटोमॅटीक नंबर प्लेट रेक्गनेशन कॅमेरे देखील बसवण्यात येत आहेत.
-------------------------------------
नियम मोडणाऱ्यांना घरपोच दंड
या कॅमेऱ्यांमध्ये ९५४ फिक्स्ड कॅमेरे, तसेच ३६० अंशांमध्ये गोलाकार चित्रण टिपणारे १६५ पीटीझे़ड कॅमेरे बसवण्यात येत आहेत. ही सर्व यंत्रणा स्वयंचलीत असल्याने सिग्नल तोडणाऱ्या, तसेच वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांच्या घरी थेट दंडात्मक चलन फोटोसह पाठवले जाणार आहे.
-----------------------------------------
या सीसी टीव्ही प्रणालीच्या कामाबाबत नुकताच आढावा बैठक झाली. त्यामध्ये ही कार्यप्रणाली अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने काही सूचना पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करून ही यंत्रणा अधिक चांगल्यारितीने वापरात आणण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्नशील आहे.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com