रंग मराठीचे

रंग मराठीचे

प्रेमळ कवी
सहज-सोपी शब्दरचना, जगण्यावर निस्सीम प्रेम करणारे आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकवणारे कवी म्हणून मंगेश पाडगावकर यांचे नाव नेहमीच अग्रणी घेतले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला त्यांचे जन्मगाव! मुंबई विद्यापीठातून त्यांनी मराठी आणि संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर मिठीबाई आणि सोमय्या महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे शिकवले. पुढे ‘साधना’ या साप्ताहिकाचे सहसंपादक, तर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात त्यांनी निर्माता म्हणून काम केले.
कवी, गीतकार, ललित लेखक म्हणून परिचित असणाऱ्या पाडगावकर यांचा १९५० मध्ये ‘धारानृत्य’ हा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला. ‘वात्रटिका’ हा काव्यप्रकार मराठीत त्यांनीच रूढ केला. उपहासात्मक कविता लोकप्रिय करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते.
बालगीत, भक्तिगीत, प्रेमगीत, भावगीत या काव्य प्रकारांत त्यांचा हातखंडा होता. ‘सांग सांग भोलानाथ’, ‘दार उघड चिऊताई दार उघड’, ‘असा बेभान हा वारा’, ‘सांगा कसं जगायचं’ या त्यांच्या कविता विशेष लोकप्रिय झाल्या. ‘सलाम’ या त्यांच्या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
‘शुक्रतारा मंद वारा’, ‘भातुकलीच्या खेळामधले’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ या पाडगावकर यांच्या गाण्यांना रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. आबालवृद्धांच्या मनातील हळव्या कोपऱ्यात स्थान मिळवलेल्या चतुरस्र कवीला २००८ मध्ये ‘महाराष्ट्रभूषण’, तर २०१३ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com