सकाळ ‘अवतरण’ला उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार

सकाळ ‘अवतरण’ला उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार

मुंबई, ता. १२ : मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहे. ‘जगन्नाथ शंकरशेठ स्मृती उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार’ सकाळ (मुंबई) च्या ‘अवतरण’ला प्रदान केला जाणार आहे. वृत्तपत्र लेखक चळवळीचे हे अमृतमहोत्सवी वर्ष असून, स्पर्धेचा निकाल संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी घोषित केला.

समाजजीवनावर प्रभाव टाकणाऱ्या विषयावर दिवाळी अंक प्रसिद्ध करण्याची ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीची परंपरा आहे. या वर्षीचा अंक हिंदुत्वावर भाष्य करणारा असून, यात धर्मकारणाची अभ्यासपूर्ण चिकित्सा मान्यवर लेखकांनी केली आहे. त्यामुळे हा अंक संग्राह्य झाला आहे. चंद्रकांत पाटणकर पुरस्कृत ‘जगन्नाथ शंकरशेठ स्मृती उत्कृष्ट अंक’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराची मोहोर उमटल्याने या अंकाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अलीकडेच या अंकाला नाशिकच्या ‘अक्षरबंध’नेही सर्वोत्कृष्ट अंक म्हणून गौरवले होते, आता त्यात या सन्मानाची भर पडली आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघ, दादर सार्वजनिक वाचनालय - धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान, गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा गौरव’ कार्यक्रमात, २६ फेब्रुवारीला या पुरस्कारांचा प्रदान सोहळा होणार आहे.

ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ. सी. रामाणी, नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ चित्रपट-नाट्य अभिनेत्री चिन्मयी सुमीत, उद्योजक शंकरशेठ माटे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. ग्रंथालय चळवळीतील दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते आणि दादर सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह दत्ता कामथे यांच्या स्मरणार्थ ‘वाचन चळवळीतील सेवाभावी कार्यकर्ता पुरस्कार’ प्रदीप कर्णिक यांना प्रदान करण्यात येणार आहे. शाखाप्रमुख संजय भगत पुरस्कृत राज्यस्तरीय लेख स्पर्धेतील विजेत्यांचाही गौरव होणार आहे, असे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर आणि अॅड. देवदत्त लाड यांनी सांगितले. दिवाळी अंक स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुनील सुर्वे आणि दत्ता मालप यांनी काम पाहिले.

पुरस्कारप्राप्त इतर दिवाळी अंक
- मनोरंजनकार का. र. मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक - महाराष्ट्र टाइम्स, मुंबई
- पांडुरंग रा. भाटकर स्मृती सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक - मुक्त आनंदघन, मुंबई
- पास्कोल लोबो पुरस्कृत गणेश केळकर स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक अंक - गोवन वार्ता, गोवा
- पु. ल. देशपांडे स्मृती सर्वोत्कृष्ट अंक - कालनिर्णय, मुंबई
- साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक - अधोरेखित, पालघर
- मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित उत्कृष्ट अंक - मनशक्ती, लोणावळा
- कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट अंक - श्रमकल्याण युग, मुंबई

पुरस्कारविजेते दिवाळी अंक
शब्दमल्हार (नाशिक), नवरंग रुपेरी (औरंगाबाद), कनक रंगवाचा (सिंधुदुर्ग), पुरुष स्पंदनं (मुंबई), शब्दगांधार (पुणे), समदा (पुणे), सह्याचल (परभणी), ठाणे नागरिक (ठाणे), संस्कार भक्तिधारा (पुणे), क्रीककथा (पुणे), कालतरंग (पालघर), शैव प्रबोधन (मुंबई), धगधगती मुंबई (मुंबई), निशांत (नगर), सत्यवेध (सांगली), गावगाथा (सोलापूर), नवरंग रुपेरी (औरंगाबाद)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com